'टाईम'च्या यादीत पंतप्रधान मोदींसोबत शाहीनबागेतील बिल्कीस दादी..!

जगभरातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान देताना टाईमने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. टाईम नियतकालिकाच्या या यादीत डोनाल्ड ट्रम्प आणि शि जिनपिंग यांचे स्थान कायम आहे.
times most influential persons list includes narendra modi and bilkis dadi
times most influential persons list includes narendra modi and bilkis dadi

नवी दिल्ली : जगभरातील शंभर प्रभावशाली व्यक्तींची यादी ‘टाईम’ नियतकालिकाने जाहीर केली आहे. या यादीत नेत्यांच्या श्रेणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे स्थान कायम आहे.  मोदींसोबतच बिल्कीस दादी आणि अभिनेता आयुष्मान खुराणा यांचा या यादीत समावेश आहे. मोदींच्या कारकिर्दीबाबत काही प्रश्नही 'टाईम'ने उपस्थित केले आहेत. 

शाहीनबागेतील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या ८२ वर्षांच्या बिल्कीस दादी  यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी शाहीनबागेतील आंदोलनामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. महिला आणि अल्पसंख्यांकांचा आवाज पुन्हा एकदा देशभरात ऐकला जावा यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांच्यामुळे नंतर अनेक महिला देशभरात या आंदोलनात उतरल्या. याचबरोबर अभिनेता आयुष्मान खुराणा याचाही प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला आहे. आयुष्मान खुराणा याचे ‘अंधाधून’, ‘बधाई हो’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवरही गाजले होते. 

या यादीत अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील उमेदवार जो बायडन, उपाध्यक्षपदाच्या शर्यतीमधील कमला हॅरिस, तैवानचे अध्यक्ष त्साई ईंग-वेन, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आणि अमेरिकेतील संसर्गजन्य आजारविषयक राष्ट्रीय संस्थेचे संचालक डॉ. अँटोनी फॉसी, कोरियन चित्रपट निर्माते बाँग जून हो, अभिनेता मायकेल बी. जॉर्डन, फोयबे ब्रिज आणि संगीतकार जेनिफर हडसन आणि सेलेने गोमेझ यांचाही समावेश आहे. अन्य श्रेणींमध्ये एचआयव्हीग्रस्तांवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले रविंद्र गुप्ता, गुगलचे सुंदर पिचाई यांचाही या यादीत समावेश आहे. 

जगातील प्रभावशाली नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश करताना 'टाईम'ने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'टाईम'ने म्हटले आहे की, मोदींच्या कारकिर्दीत भारताच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेभोवती संशयाचे धुके दाटल्याचे म्हटले आहे. त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांना अन्य समुदायाशी काहीही देणेघेणे नाही असे दिसते. देशातील विरोध दाबून टाकण्यासाठी मोदी सरकारला कोरोना संकटाचे निमित्त मिळाले आहे. यामुळे जगातील सर्वांत मोठी जिवंत लोकशाही काळोखामध्ये गेली आहे. भारतामध्ये ख्रिस्ती, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन यांच्यासह अनेक धर्मीय सलोख्याने राहतात. 

भारतात निर्वासिताचे जीवन जगणारे तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनीही येथील स्थैर्य आणि सौहार्दाचे कौतुक केले असल्याचा दाखला ‘टाईम’च्या लेखात देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या भाजप या हिंदू राष्ट्रवादी पक्षाने उच्चभ्रूवादाबरोबरच विविधतेच्या तत्त्वालाही बाजूला फेकले आहे. विशेष म्हणजे यात मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले, असे 'टाईम'ने म्हटले आहे. मागील वर्षी मे महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या टाईममधील लेखात मोदींना भारताचे ‘डिव्हायडर ऑफ इंडिया’ अशी उपमा देण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com