बिहारच्या निवडणुकीत सासरे-जावयांच्या जोड्या उडवणार धुरळा..!

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात होणारी ही निवडणूक अनेक कारणांनी लक्षणीय ठरत आहे.
three pairs of father in law and son in law in bihar assembly election
three pairs of father in law and son in law in bihar assembly election

नवी दिल्ली : बिहारमधील विधानसभा निवडणूक कोरोना प्रादुर्भावाच्या काळात होत असून, ती व्हर्च्युअल प्रचाराने गाजणार आहे. अनेक कारणांनी ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. या निवडणुकीत सासरे आणि जावयांच्या तीन जोड्या रिंगणात उतरलेल्या दिसणार आहेत. याचबरोबर व्याही-विहीण आणि पती-पत्नी हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे  चित्र आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

विधानसभेच्या रिंगणात उतरलेली पहिली जोडी आहे, हिंदुस्तान आवाम पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी आणी त्यांच्या जावयाची. मांझी हे इमामगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याचवेळी त्यांचे जावई देवेंद्र मांझी मखदमपूर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. याचवेळी जितनराम मांझी यांच्या विहीण ज्योतिदेवी बाराचट्टी येथून निवडणूक लढत आहेत. 

दुसरी जोडी आहे मधेपुरा जिल्ह्यातून रिंगणात उतरली आहे. सध्याच्या जेडीयूचे नेते व सरकारमधील मंत्री आणि सलग 25 वर्षे अपराजित राहिलेले नरेंद्र नारायण यादव आलगनगर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांचे जावई निखिल मंडल हे मधेपुरा मतदारसंघातून उभे आहेत. निखिल मंडल हे जेडीयचे प्रवक्ते असून, ते पहिल्यांदात विधानसभा निवडणूक लढवत आहेत. 

आरजेडीचे तेजप्रताप यादव आणि त्यांचे सासरे ही तिसरी जोडी आहे. तेजप्रताप हसनपूरमधून उभे आहेत तर, त्यांचे सासरे चंद्रिका राय हे जेडीयूच्या तिकिटावर परसा मतदारसंघातून उभे आहेत. सासरे आणि जावई विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. याचबरोबर जेडीयूचे आमदार कौशल यादव नवादा मतदारसंघातून उभे आहेत आणि त्यांच्या पत्नी पौर्णिमा देवी या गोविंदपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत पौर्णिमा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती.  

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ऑल  ओवेसी यांचा इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com