शहांचा करिष्मा...काँग्रेसची सत्ता घालवणारे सातपैकी पाच नेते भाजपमध्ये

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
three former mlas join bjp in presence of amit shah at puducherry
three former mlas join bjp in presence of amit shah at puducherry

पुदुच्चेरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुदुच्चेरीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असून, नुकताच आमदारकीचा राजीनामा दिलेले तीन नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. राज्यातील काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी कारणीभूत असलेले सातपैकी पाच आमदार अखेर भाजपच्या गळाला लागले आहेत. 

अमित शहा ते आज पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर आहेत. कराईकल येथे त्यांची जाहीर सभा झाली. या वेळी नुकताच आमदारकीचे राजीनामा दिलेले काँग्रेस नेते जॉन कुमार, द्रमुकचे वेंकटेशन आणि पीएमकेचे अरूल मुरूगन या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी कुमार यांचे पुत्र जॉन रिचर्ड, उद्योगपती दामोदरन, विधानसभा अध्यक्ष व काँग्रेस नेते व्ही.पी.सिवाकोलूंधू यांचे बंधू व्ही.पी.रामलिंगम, त्यांचा पुत्र रमेश आणि इतर दोन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

याआधी राजीनामा दिलेले काँग्रेसचे दोन मंत्री ए.नमाशिवायम आणि थेपिएंथन हे भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. इतर काँग्रेस नेतेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून भाजपकडे वाटचाल करीत आहेत. आता राजीनामा देणारे लक्ष्मीनारायणन आणि मल्लादी कृष्णराव हे दोन आमदारच अद्याप कुठल्याही पक्षात गेलेले नाहीत. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता आहे.  

काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर भाजप व इतर विरोधी पक्षांनीही सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. काँग्रेसच्या सरकारला विधानसभेत बहुमत सिध्द न करता आल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस आघाडीतील सात आमदारांनी राजीनामा दिल्याने विधानसभेत सरकारला २२ फेब्रुवारीला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले होते. परंतु, बहुमत गाठण्यासाठी १४ आमदारांचा आकडा काँग्रेसकडे नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी सभागृहात भाषण करून विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधीच बाहेर पडले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला होता. 

तमिळनाडू व पुदुच्चेरीमध्ये 6 एप्रिलला विधानसभा निवडणूक  होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूमध्ये काँग्रेस व द्रमुक यांची आघाडी आहे. या दोन पक्षांचीच पुदुच्चेरीमध्ये सत्ता होती. एकूण ३० विधानसभा सदस्य असलेल्या पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसचे १५ आमदार होते. काँग्रेसने द्रमुकच्या दोन आमदारांच्या पाठिंब्यानंतर बहुमताचा आकडा गाठला होता. 

भाजपचे तीन आमदार असले तरी ते निवडून आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नव्हता. तसेच निवडणुका जवळ आल्याने विरोधी पक्ष एवढ्या कमी कालावधीसाठी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, हे स्पष्टच होते. भाजपकडून तसे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रीमंडळाने पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. 

Edited By Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com