पहिल्या टप्प्यात कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले 37 डॉक्टर एकाचवेळी पॉझिटिव्ह - thirty seven doctors of delhi hospital test covid 19 positive | Politics Marathi News - Sarkarnama

पहिल्या टप्प्यात कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले 37 डॉक्टर एकाचवेळी पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. आता लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लशीचे दोन्ही डोस घेतलेले डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. 
 

नवी : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. आता दिल्लीतील एका रुग्णालयातील तब्बल 37 डॉक्टर एकाचवेळी पॉझिटिव्ह सापडले आहेत. या सर्वांना सौम्य लक्षणे असून, काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात या सर्व डॉक्टरांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते. 

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ही घटना घडली आहे. रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करीत असताना डॉक्टरांना संसर्ग झाला. एकाचवेळी 37 डॉक्टरांना संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. त्यातील 5 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उरलेले डॉक्टर घरीच विलगीकरणात आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात या डॉक्टरांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख