Ahmednagar Politics : जिल्हा बँकेंच्या राजकारणातून विखेंनी मारले एका दगडात अनेक पक्षी

Ahmednagar District Central Cooperative Bank : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात विखेंची ताकद वाढली?
Radhakrishna Vikhe Patil and Ahmednagar District Central Cooperative Bank
Radhakrishna Vikhe Patil and Ahmednagar District Central Cooperative Bank Sarkarnama

Radhakrishna Vikhe Patil : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नाट्यमय घडामोडीनंतर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची आज निवड झाली. त्यामुळे आघाडीच्या ताब्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक आता भाजपच्या ताब्यात गेली आहे.

या निवडणुकीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेवटच्या क्षणी बाजी पलटवली आणि शिवाजी कर्डिले यांची अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

मात्र, या निवडणुकीच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Radhakrishna Vikhe Patil and Ahmednagar District Central Cooperative Bank
Ahmednagar : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड होताच कर्डिलेंनी सांगितलं विजयाचं गणित

नगरच्या राजकारणात विखेंची ताकद वाढली?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कर्डिलेंची निवड झाल्यामुळे आघाडीच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक आता भाजपच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे विखे पाटील पिता-पुत्रांनी केलेली राजकीय खेळी पुन्हा एकदा यशस्वी झाली. यामुळे नगरच्या राजकारणात पुन्हा विखे पाटलांचे वर्चस्व पाहायला मिळाले.

राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे आहे. तर त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे अहमदनगर दक्षिणमधून खासदार आहेत.

त्यामुळे नगरच्या राजकारणात विखेंचे वर्चस्व हे पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून नगरच्या राजकारणात विखेंची ताकद वाढली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Radhakrishna Vikhe Patil and Ahmednagar District Central Cooperative Bank
Ahmednagar News : विखेंनी बॅंक ताब्यात घेतली; मतदान झाल्यावरच बिंग फुटले : थोरातांना धक्का देणारे चारजण कोण?

कर्डीलेंची नाराजी दूर?

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. राहुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे निवडून आले. मात्र, कर्डिलेंचा पराभव हा पक्षातील अंतर्गत कलहामुळे झाला असल्याची चर्चा तेव्हा राजकीय वर्तुळात होती.

त्यानंतर कर्डीलेंसह जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षातील वरिष्ठांची भेटही घेतल्याचे सांगण्यात येते. तसेच पराभवामुळे आणि पक्षातील अंतर्गत कलहामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता त्यांची अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली असावी.

Radhakrishna Vikhe Patil and Ahmednagar District Central Cooperative Bank
Nagar News : नगरमध्ये आघाडीला धक्का : एका रात्रीत खेळ पलटला; थोरात-पवारांची काल बैठक अन् आज चार मते फुटली

आगामी निवडणुकीची तयारी?

राज्यात काही दिवसांनी महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवरच अहमदनगर जिल्हा बँकेवर भाजपच्या कर्डिलेंची निवड ही आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपसाठी महत्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे. या निवडीच्या माध्यमातून विखेंची आगामी निवडणुकीसाठी एक प्रकारे तयारीच असल्याचे बोलले जात आहे.

बाळासाहेब थोरातांना धक्का?

नगरच्या राजकारणात नेहमीच थोरात आणि विखे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही थेट थोरातांच्या मतदारसंघात विखेंनी अनेक ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच निवडून आणण्यात यश मिळवले होते. आता पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून थोरातांना मोठा धक्का दिला असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com