श्रीकांत शिंदेंनी शर्थीची खिंड लढवत शिवसेनेचा बालेकिल्ला उभा केला वडिलांच्या पाठिशी!

श्रीकांत शिंदे हे ठाण्याबरोबरच कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदी भागातील शिवसैनिकांच्या सातत्याने संपर्कात होते. तेथील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते.
Eknath shinde News, Shrikant Shinde News, Shivsena News
Eknath shinde News, Shrikant Shinde News, Shivsena NewsSarkarnama

डोंबिवली : शिवसेना आमदार फोडल्यानंतर आता नगरसेवकांचा नंबर लागला असून ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील 55 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शविला आहे. शिवसेनेतील 45 हून अधिक नगरसेवकांचा यात समावेश असून भाजपमधून सेनेत आलेल्या 7 नगरसेवकांसह 3 माजी आमदारांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी कल्याण डोंबिवलीतील नगरसेवक दाखल झाले होते. त्यांच्यातील बैठकीनंतर त्यांनी शिंदे गटात सामील होत असल्याचे जाहीर करत पाठिंबा दर्शविला. (Thane, Kalyan- Dombivali Shiv Sena corporators support Chief Minister Eknath Shinde)

आता केवळ 3 ते 4 नगरसेवकांची मनधरणी शिल्लक असून तेही लवकरच शिंदे गटात सामील होतील असा विश्वास शिंदे समर्थकांनी यावेळी व्यक्त केला आहे. नगरसेवकांच्या शिंदे गटात सामील होण्याच्या भूमिकेमुळे कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या गडाला खिंडार पडले असून येथे शिंदेशाहीचा विजय झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.(Shrikant Shinde News in Marathi)

राज्यात सत्तांतर नाट्य घडत असताना कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिकांनी मात्र अळीमिळी गुपचिळी साधली होती. काही शिवसैनिक ठाणे, मुंबईत जाऊन शिंदे, ठाकरे यांच्या भेटी घेत होते. परंतू उघडपणे आपली भूमिका मांडण्यास ते नकार देत होते. कल्याण ग्रामीणमधील शिवसैनिकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिल्यानंतर डोंबिवलीतील शिवसैनिकांनी देखील ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला. मात्र, शिंदे यांच्या विरोधात कोणतीही भूमिका न मांडण्याचा निर्णय बंद दाराआड घेण्यात आला होता.

निष्ठावान शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे, बैठकीला उपस्थित असणारे नगरसेवक, पदाधिकारी नंतर शिंदे गटाच्या बैठकीला देखील हजर राहत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत असल्याने ते नक्की कोणत्या गटाचे याचा सामान्य कार्यकर्त्यांना प्रश्न पडला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे सरकार आल्यानंतर या नगरसेवकांनी शिंदे यांची भेट घेतल्याने आता हा संभ्रम संपुष्टात आला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेतील नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. राज्यात मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपची सत्ता असल्याने येत्या पालिका निवडणुकीत आपल्याला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, असा विचार हे नगरसेवक करत आहेत. स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे करताना मातोश्रीपेक्षा ठाणे जवळ असल्याने शिंदे यांच्यासोबत जाण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे.

मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. कल्याण हा सेनेचा बालेकिल्ला आहे, तर डोंबिवली हा संघाचा प्रभाव असलेला मतदार संघ आहे. येथे भाजपला कडवी झुंज देत सेनेने सत्ता खेचून आणली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ५३ माजी व २ स्वीकृत नगरसेवक आहेत. पालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला अपक्ष गटातील चार नगरसेवकांनी साथ दिली होती. त्यामुळे पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ५९ झाले होते. या गटातील ४५ च्या आसपास नगरसेवक गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेले होते.

यामध्ये डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, युवा सेना जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, विशाल पावशे, रवी पाटील, नितीन पाटील, रंजना पाटील, नीलेश शिंदे, विनिता राणे, विश्वनाथ राणे, सुशिला माळी, रणजीत जोशी, सुनीता पाटील, महेश पाटील, जनार्दन म्हात्रे यांसह काही नगरसेवकांचा सहभाग होता. काही कारणास्तव इतर नगरसेवक उपस्थित नव्हते, मात्र त्यांनी आम्हाला पाठींबा जाहीर केला असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. उर्वरीत नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होतील असा विश्वास खासदार शिंदे यांना आहे.

कल्याण ग्रामीण भागातील नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंना समर्थन दिल्याचा ठराव पास केला होता. शिंदे यांच्या भेटीच्या वेळी ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती जाणवत होती. कोणी बाहेरगावी आहेत, तर घरातील काही अडचणींमुळे ते उपस्थित राहू शकले नाही, त्यांनी आम्हाला पाठींबा जाहीर केला असून लवकरच ते जाहीर करतील असे शिंदे समर्थकांनी सांगितले.

शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाण्यातील नगरसेवकांनी त्यांना उघड पाठिंबा दिला होता. शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात राहून शिवसैनिकांचा रोष पत्करुन मुख्यमंत्री शिंदे व बंडखोर आमदार हे शिवसैनिकांच्या भल्यासाठीच गेले असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना बळ देत होते. ठाण्यात, दिव्यात सभा घेत त्यांनी कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर केला. ठाण्याच्या पलीकडील कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदी भागातील शिवसैनिकांच्या ते सातत्याने संपर्कात होते, तेथील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते.

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड होताच ठाणे जिल्ह्यातील नाराज तसेच संभ्रमावस्थेत असलेल्या नगरसेवकांना, कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे मन वळविण्यात खासदार शिंदे हे यशस्वी झाले आहेत. शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करुन घेण्यात त्यांचा मोठा वाटा असून त्यांनी केलेली व्यूहरचना यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com