उपमुख्यमंत्रिपदी सुशील मोदींऐवजी कोण...भाजप विधिमंडळ नेतेपदी प्रसाद - Tarkishore Prasad unanimously elected as the leader of BJP legislature party in Bihar | Politics Marathi News - Sarkarnama

उपमुख्यमंत्रिपदी सुशील मोदींऐवजी कोण...भाजप विधिमंडळ नेतेपदी प्रसाद

वृत्तसंस्था
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या एनडीएला विजय मिळाला होता. आधी जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार यांची निवड झाली आहे. याचवेळी भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड झाली आहे.  

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच असतील यावर आज शिक्कामोर्तब झाले. एनडीएच्या आज झालेल्या बैठकीत नितीशकुमारांचे नाव अंतिम झाले. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे उपमुख्यमंत्रिपदी सुशीलकुमार मोदी राहणार की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 
 
बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली होती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. 

राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांका वर 74 जागांसह भाजप आहे. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. आता अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले आहे. 

सत्ता स्थापनेची चर्चा करण्यासाठी एनडीएची बैठक आज झाली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार यांचे नाव निश्चित करण्यात आले. मागील आठवड्यात नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेंडू एनडीएच्या कोर्टात फेकला होता. मुख्यमंत्री कोण होईल, हे एनडीए ठरवेल, असे नितीशकुमार म्हणाले होते. आज भाजपच्या आणि जेडीयूच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीशकुमारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. नितीशकुमार हे चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

एनडीएच्या बैठकीत नितीशकुमारांच्या नावाबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर ते तातडीने राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांच्यासह एनडीएचे अनेक नेते उपस्थित होते. उद्या (ता.१६) सायंकाळी ४.३० वाजता नितीशकुमार यांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, भाजपने विधिमंडळ नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड केली आहे. उपनेतेपदी रेणू देवी यांची निवड झाली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी या नावांचा घोषणा केली. भाजपने अद्याप उपमुख्यमंत्रिपदी कोण असेल याची घोषणा केलेली नाही. विधिमंडळ नेतेपदी प्रसाद यांची निवड झाल्याने तेच उपमुख्यमंत्री असतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, सुशीलकुमार मोदी यांच्याकडे दुसरी कोणती जबाबदारी द्यायाची हा प्रश्न पक्षासमोर आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

प्रसाद हे कटिहार जिल्ह्यातील असून, ते मागील ६४ वर्षे कटिहारमधून भाजपचे उमेदवार आहेत. या वेळी सलग चौथा विजय त्यांनी कटिहारमधून मिळवला आहे. प्रसाद यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्वांत प्रथम त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात सुशीलकुमार मोदी आघाडीवर होते. 

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असे आधी स्पष्ट केले होते. भाजप आणि जेडीयूच्या जागांमधील फरकाचा कोणताही परिणाम राज्यातील सत्तासमीकरणावर झालेला सध्या तरी दिसत नाही. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख