तन्मय फडणवीसला लस कशी मिळाली? माहिती अधिकारात अखेर उलगडा झाला - tanmay fadnavis taken covid jab as a health care worker | Politics Marathi News - Sarkarnama

तन्मय फडणवीसला लस कशी मिळाली? माहिती अधिकारात अखेर उलगडा झाला

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय यांनी कोरोना लस घेतल्याने मोठा गदारोळ उडाला होता. 

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे २५ वर्षीय पुतणे तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) यांनी आरोग्य कर्मचारी असल्याचे सांगत सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाची लस (Covid Vaccine) घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयानेच (Seven Hills Hospital) माहिती अधिकारांतर्गत ही माहिती उघड केली आहे. 

तन्मय फडणवीस यांनी वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच लस घेतली होते. त्यांचा लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता.  याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य करण्यात आले होते. देशात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली; मात्र तन्मय फडणवीस यांनी १३ मार्चला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. 

हेही वाचा : प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश अन् दुसऱ्याच दिवशी शहांच्या भेटीला योगी 

तन्मय यांना लस मिळाली कशी? असा सवाल त्यावेळी विरोधकांकडून करण्यात आला होता. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका झाली होती. त्यावर तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याने लस कशी घेतली, हे मला माहिती नसल्याचा खुलासा फडणवीस यांनी केला होता. याबाबत मी लेखी निवेदन दिले असून, अधिक बोलण्याची गरज नाही, अशी भूमिकाही फडणवीस यांनी घेतली होती. 

या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयाकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. त्यावर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सुरुवातीला केवळ आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांनाच कोरोना लस देण्यात येत होती. यासाठी कोविनवर नोंदणी करणे आवश्यक होते. तन्मय फडणवीस याने ती नोंदणी केली होती. त्यामुळे रुग्णालयाने केवळ शासकीय ओळखपत्र बघून त्याला लस दिली.

तन्मय हे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे व माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू आहेत. तन्मय यांच्या ट्विटर अकाउंटवर ते अभिनेता असल्याचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात त्यांनी आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतली आहे. देशात मोठ्या प्रमाणात लशीची टंचाई असताना अशा पद्धतीने लस घेणे कितपत योग्य आहे. नेमके खरे काय आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनीच आता सांगावे, असे नितीन यादव यांनी म्हटले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख