निवडणूक आयोगाच्या आधीच विधानसभेत घोषणा करुन मुख्यमंत्र्यांनी मारली बाजी! - tamil nadu chief minister palaniswami announces gold loan waiver before election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

निवडणूक आयोगाच्या आधीच विधानसभेत घोषणा करुन मुख्यमंत्र्यांनी मारली बाजी!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

निवडणूक आयोगाकडून तमिळनाडूसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होत आहेत. 

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून आज पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहे. आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी काही तास आधी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला फार मोठी खूषखबर दिली आहे. त्यांनी राज्यातील जनतेचे सोने कर्जच माफ करण्याची घोषणा करुन टाकली आहे. निवडणूक आयोगाच्या आधी घोषणा करुन मुख्यमंत्र्यांनी बाजी मारली आहे. 

तमिळनाडूमध्ये सध्या अण्णाद्रमुकची सत्ता असली तरी आगामी निवडणुकीत पक्षांतून निलंबित करण्यात आलेल्या शशिकला यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. तमिळनाडू विधानसभेत 234 आमदार असून सध्या अण्णाद्रमुक आघाडीकडे 134 जागा आहेत. द्रमुक आणि काँग्रेसच्या आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला या राज्यात खातेही खोलता आले नव्हते. मात्र, या वेळी भाजपने सत्ताधारी पक्षासोबत आघाडी केली आहे. त्यामुळे यावेळी भाजपला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. 

आता निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करण्याआधी मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांनी राज्यातील जनतेचे सोने कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू होत असल्यामुळे पलानीस्वामींना निवडणुकीच्या घोषणेआधी सोने कर्ज माफ करण्याची घोषणा करुन बाजी मारली आहे. सहकारी बँकाँनी शेतकरी आणि गरीबांना सुमारे 50 ग्रॅमपर्यंत दिलेले सोने तारण कर्ज माफ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या घोषणेआधी विधानसभेत करुन मोठी खेळी खेळली आहे.  

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. तर पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर काँग्रेस येथील सत्ता गेल्याने या पाच राज्यात एकाही ठिकाणी सत्तेत नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. 

या पाचही राज्यांमध्ये भाजप, काँग्रेससह स्थानिक प्रादेशिक पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. सभा, विविध विकासकामांचे उद्घाटन यांसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या नसल्या तरी बहुतेक पक्षांनी प्रचाराची एक फेरी जवळपास पूर्ण केली आहे. आता केवळ आयोगाकडून तारखा जाहीर होण्याची प्रतिक्षा आहे. आज सायंकाळी साडे चार वाजता आयोगाकडून या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख