मंत्रिमंडळात एकही महिला का नाही? तालिबाननं उघड केलं कारण...

अफगाणिस्तानच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. यावर अखेर तालिबानने खुलासा केला आहे.
taliban spokesperson clarifies about no woman minister cabinet
taliban spokesperson clarifies about no woman minister cabinet

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानकडून (Taliban) नव्या सरकारची घोषणा करण्यात आली असून मुल्ला हसन अखुंजादा हा सरकारचं नेतृत्व करणार आहे. हसन हा देशाचा पंतप्रधान असेल तर मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्याकडे उपपंतप्रधानपद देण्यात आलं आहे. याचवेळी मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. यावर अखेर तालिबानने खुलासा केला आहे. 

मागील तीन आठवड्यांपासून तालिबानकडून सरकारच्या रचनेबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने नवीन सरकारमधील मंत्र्यांची यादी जाहीर केली. हे मंत्रिमंडळ अंतरिम असून त्यामध्ये आणखी काही मंत्र्यांच्या नावे समाविष्ट केली जाणार आहेत. पंतप्रधानपद मिळालेला हसन हा तालिबानचा सस्थापक मुल्ला उमर याचा सहकारी आहे. तो सध्या तालिबानच्या तालिबानमध्ये महत्वाचे निर्णय घेणाऱ्या परिषदेचा प्रमुख आहे. त्याचं नाव संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीतही असल्याचं वृत्त आहे. 

मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. यावरुन सोशल मीडियावर तालिबानला लक्ष्य करण्यात येत आहे. याबद्दल  बोलताना तालिबानचा प्रवक्ता सईद झकरूल्ला हशिमी म्हणाला की, महिला या मंत्री होऊ शकत नाहीत. त्यांना मंत्रिपद देणे म्हणजे त्यांना सोसवणार नाही एवढे ओझे त्यांच्या गळ्यात अडकवण्यासारखे आहे. महिला या मंत्रिमंडळात असाव्यात हे आवश्यक नाही. त्यांना जन्म देण्याचे काम करावे. 

अफगाणिस्तानात निदर्शने करणाऱ्या महिला या संपूर्ण देशातील महिलांचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. केवळ चार महिला रस्त्यावर निदर्शने करीत आहेत म्हणजे सगळ्या महिलांचे म्हणजे म्हणणे मांडत आहेत, असे नाही. अफगाणिस्तानमधील महिला या अफगाणी नागरिकांना जन्म देणाऱ्या आणि मुलांना मुस्लिम मूल्ये शिकवणाऱ्या आहेत. अमेरिकी माध्यमे आणि अमेरिकेच्या हातातील कळसुत्री बाहुले असलेल्या आधीच्या सरकारने सर्व गोष्टी चुकीच्या केल्या, असेही हशिमी याने सांगितले. 

तालिबानच्या राजकीय विभागाचा प्रमुख असलेला बरादर सरकारचं नेतृत्व करेल, अशी काही दिवसांपपर्यंत चर्चा होती. त्याला उपपंतप्रधानपद देण्यात आलं आहे. तोही तालिबानचा सहसंस्थापक आहे. अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेल्या हक्कानी नेटवर्कचा संस्थापकाचा मुलगा असलेला सराजुद्दीन हक्कानी यालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्याच्याकडं देशांतर्गत बाबींचे मंत्रिपद आलं आहे. 

त्याचप्रमाणे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रीपदी अमीर खान मुत्ताकी, उप परराष्ट्र मंत्री अब्बास स्टॅनिकझाई संरक्षण मंत्री मुल्ला याकूब यांचाही समावेश करण्यात आला आहे. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद हा माहिती मंत्रालयाचा उपमंत्री असेल. या मंत्रिमंडळामध्ये तालिबानमधील नेत्यांचाच समावेश आहे. पूर्वीच्या अफगाण सरकारमधील नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान, सध्या तालिबानचा सर्वोच्च नेता असलेल्या मुल्ला हबितुल्ला अखुंजदा यानेच मुल्ला हसन याचं नाव पुढे केल्याचं वृत्त आहे. अखुंजादा याचं सरकारवर नियंत्रण राहणार आहे. हसन याच्याकडं पंतप्रधान पद असलं तरी अखुंजादाच्या हस्तक्षेपाशिवाय महत्वाचे निर्णय घेतले जाणार नाहीत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com