सर्वोच्च न्यायालयाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुनावणीलाही कोरोना विषाणूची 'बाधा' - supreme court video conferencing hearing deferred due to judge staff found covid positive | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुनावणीलाही कोरोना विषाणूची 'बाधा'

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 एप्रिल 2021

अनेक ठिकाणी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. 

नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. परंतु, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या सुनावणीवरही याचा आता परिणाम होऊ लागला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम.आर.शहा आणि डी.वाय.चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आज एका प्रकरणाची सुनावणी होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने ही सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायाधीश चंद्रचूड यांनी काही मिनिटाची विश्रांती घेण्याची सूचना केली. न्यायाधीश शहा यांच्या घरी काही तरी अडचण आहे. त्यावर ते मार्ग काढत आहेत. आपण पुन्हा थोड्या वेळाने सुनावणी सुरू करु, असे त्यांना सांगितले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांच्या निवासस्थानी काम करणारे कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यातही अडचणी येत आहेत. मागील रविवारी सर्वोच्च न्यायालयातील 90 पैकी 40 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले होते. यामुळे न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसोबत प्रत्यक्ष सुनावणीचा सुरू केलेला पर्याय लगेचच रद्द केला होता. आता न्यायाधीशांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे सुनावणी होत आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. 

देशात मागील 24 तासांत दोन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. तर एक हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला. भारत देशातील रोजच्या रुग्णवाढीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. जगात दररोज आढळून येणाऱ्या प्रत्येक पाच कोरोनाबाधित रुग्णांमध्ये किमान एक भारतीय रुग्ण आहे. मागील आठवड्यात ब्राझीलमध्ये ही परिस्थिती होती. आता भारताने ब्राझीललाही मागे टाकले आहे. 

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाबाधितांची संख्या जवळपास सव्वा तीन कोटींवर पोचली आहे. दोन दिवसांपर्यंत अमेरिकेनंतर ब्राझीलचा क्रमांक लागत होता. पण 12 एप्रिलला भारताने ब्राझीलला मागे टाकले. ब्राझीलमध्ये 12 एप्रिलला 1 कोटी 35 लाख कोरोनाबाधित होते. तर भारतात हा आकडा 1 कोटी 36 लाखांच्या पुढे गेला आहे. मागील महिनाभरात भारतात वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे कमी कालावधीतच भारत जगातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला दुसरा देश ठरला आहे. 

भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही मान्य केले आहे. ''नवीन रुग्णसंख्येकडे पाहिले तर देशात यापूर्वीचा रोजच्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा आपण केव्हाच ओलांडला आहे. तसेच त्यात वाढ होतच चालली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे,'' असे त्यांनी सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख