हा काय मूर्खपणा आहे? सर्वोच्च न्यायालयाने रेहाना फातिमा यांना सुनावले - supreme court slams social activist rehana fathima over obscene video | Politics Marathi News - Sarkarnama

हा काय मूर्खपणा आहे? सर्वोच्च न्यायालयाने रेहाना फातिमा यांना सुनावले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

केरळमधील सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रेहाना प्रतिमा यांच्यामुळे केरळमध्ये मोठा गदारोळ उडाला होता. 

नवी दिल्ली : केरळमधील सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांचे अर्धनग्न शरीर त्यांचा लहान मुलगा व मुलगी रंगवत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने रेहाना फातिमा यांना फटकारले. याचबरोबर त्यांची याचिकाही न्यायालयाने नामंजूर केली आहे. 

रेहाना यांचे अर्धनग्न शरीर त्यांचा 14 वर्षांचा मुलगा आणि 8 वर्षांचा मुलगी रंगवत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या प्रकरणी रेहाना यांच्यावर मुलांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला होता. कोणताही शिक्षायोग्य गुन्हा केला नसल्याचे फातिमा यांनी म्हटले होते. तसेच, तो अजामीपात्र नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. मुलांचे अश्लील चित्रण हे पॉक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा ठरते, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी रेहाना यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

रेहाना यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, महिलांच्या शरीराकडे मुलांना सामान्यपणे पाहता यावे हा माझा हेतू होता. लैंगिकतेच्या विपर्यास केलेल्या कल्पनांपासून मुक्त करण्यासाठी मी हे केले. माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात मी पूर्णपणे सहकार्य केले आहे. केरळमधील अनेक देवतांच्या मूर्ती पूर्ण कपड्यात नसतात. मात्र. मंदिरात त्यांची पूजा करताना भाविकांच्या मनात चुकीचा भाव येत नाही. ते अध्यात्मिक भावनेने त्याकडे पाहतात. आईचे शरीर मुलांनी रंगवणे याला मुलांचे शोषण असे कसे म्हणता येईल? 

रेहाना यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने रेहाना यांना फटकारले. न्यायालय म्हणाले की, हा काय मूर्खपणा आहे?  तुम्ही हे कशासाठी करीत आहात? तुम्ही अश्लीलता पसरवत आहात. यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे.  

Edited by Sanjay Jadhav

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख