देशात गोंधळाची स्थिती! सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला फटकारले - supreme court slams central government over covid 19 crisis in country | Politics Marathi News - Sarkarnama

देशात गोंधळाची स्थिती! सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला फटकारले

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. याची दखल अखेर सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, केंद्र सरकारला फटकारले आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 14 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 104 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधांची टंचाई निर्माण झाली असून, लसीकरणाबाबतही गोंधळाचे वातावरण आहे. याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने आज  केंद्र सरकारला सुनावले. 

देशातील सहा उच्च न्यायालयांमध्ये ऑक्सिजन, खाटा, रेमडेसिव्हिरची टंचाईशी निगडित याचिकांवर सुनावणी सुरू आहे. यामुळे अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पुढाकार घेतला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले की,ऑक्सिजनचा पुरवठा, अत्यावश्यक औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि प्रकार या चार मुद्द्यांवर आम्ही राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्याचा अधिकार आमच्याकडे कायम ठेवला आहे. दिल्ली, मुंबई, सिक्कीम, मध्य प्रदेश, कोलकता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. याची सर्वोच्च न्यायालय स्वत:हून दखल घेईल. सध्या जे घडत आहे ते गोंधळाचे असून, स्त्रोत दुसरीकडे वळवण्याचे प्रकार सुरू आहेत. 

आम्हाला या प्रकरणी केंद्र सरकारचा राष्ट्रीय आराखडा काय आहे याची माहिती हवी आहे, असे सरन्यायाधीशांनी सांगून सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली आहे. न्यायालयाची या प्रकरणात मदत करण्यासाठी हरीश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. 

रुग्णसंख्या वाढता वाढता वाढे...
जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले नाहीत तेवढे रुग्ण भारतात मागील 24 तासांत आढळले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 59 लाख 30 हजार 965 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 84 हजार 657 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 14 हजार रुग्ण सापडले, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाखांवर गेली आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग 43 व्या दिवशी वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाख 91 हजार 428 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 14.38 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 84.46 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 34 लाख 54 हजार 880 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.16 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख