सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फक्त जैन मंदिरांसाठीच गणेशोत्सवासाठी नाही... - supreme court said order about jain temple will not be applied to ganesh chaturthi celebrations | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फक्त जैन मंदिरांसाठीच गणेशोत्सवासाठी नाही...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

पर्युषण पर्वाच्या काळात जैन मंदिरे दोन दिवस खुली ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली आहे. गणेशोत्सवासाठी ही मुभा नसेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर या भागातील जैन मंदिरे पर्युषण काळात भाविकांसाठी शेवटचे दोन 22 व 23 ऑगस्टला दिवस खुली राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही मुभा दिली असून, केंद्र सरकारच्या  मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत. जैन मंदिरांबाबतचा हा निर्णय गणेशोत्सवासाठी लागू नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 
श्री पार्श्वतिलक श्वेतांबर मूर्तिपूजक जैन ट्रस्टने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पर्युषण पर्व 15 ऑगस्टपासून सुरू झाले असून, या काळात भाविकांसाठी जैन मंदिरे खुली करावीत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, हा आदेश इतर ट्रस्ट तसेच, इतर मंदिरांसाठी नाही हे आम्ही स्पष्ट करतो. जास्त गर्दी होईल अशा प्रकरणांमध्ये आमचा आदेश लागू असणार नाही. याचिकाकर्त्यांना आम्ही केवळ दादर, भायखळा आणि चेंबूर भागातील जैन मंदिरामध्ये पर्युषण पर्वातील शेवटचे दोन दिवस मंदिरे खुली ठेवण्यास मुभा देत आहोत. 

याचिकाकर्त्यांनी या प्रकरणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायला हवे. आमच्यासमोरही याचिकाकर्त्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येईल, असे म्हटले आहे. याचिकाकर्त्या योग्य पद्धतीने सर्व नियमांचे पालन करतील हे गृहित धरुन त्यांना ही परवानगी देण्यात येत आहे. मंदिरे खुली करणे हे धोकादायक नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 

यावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू संघवी यांनी तर याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी बाजू मांडली. जैन मंदिरांना परवानगी दिल्यास इतर धर्मातील लोकही अशीच मागणी करतील, असा मुद्दा संघवी यांनी उपस्थित केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जास्त गर्दी जमा होईल अशी धार्मिक कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही. त्यामुळेच जैन मंदिरांबाबत दिलेला हा निर्णय गणेशोत्सवासाठी लागू नाही. योग्य शारीरिक अंतर राखून मर्यादित व्यक्तींना प्रवेश मंदिरात देण्यात येत असेल तर सर्वच मंदिरे उघडण्यास आमची हरकत नाही. 

पर्युषण पर्वाच्या काळात जैन मंदिरे खुली करता येणार नाहीत, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात घेतली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आल्याचे केवळ जैन मंदिरे खुली करता येणार नाहीत, असे सरकारने म्हटले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची बाजू मान्य केली होती. याला ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख