उच्च न्यायालयाच्या लॉकडाउनच्या आदेशाला 24 तासांतच सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती - supreme court pause allahabad high court order about lockdown in five cities | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

उच्च न्यायालयाच्या लॉकडाउनच्या आदेशाला 24 तासांतच सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 एप्रिल 2021

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानेच राज्यातील प्रमुख पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावला होता. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानेच राज्यातील प्रमुख पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावला आहे. याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.  

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी राज्यात 15 मेपर्यंत दर रविवारी लॉकडाउन जाहीर केला आहे. राज्यात शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची गंभीर दखल घेतली होती. राज्यातील पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काल (ता.19) दिले आहेत. प्रयागराज, लखनौ, वाराणसी, कानपूर नगर आणि गोरखपूर या शहरांत 26 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लागू होणार आहे. या शहरांमध्ये लॉकडाउनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. 

लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे. या पाच शहरांत फळे, भाजीपाला विक्रेत, दूध आणि ब्रेड विक्रेते यांनी दररोज सकाळी 11 वाजेपर्यंत परवानगी असेल. त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा तेवढ्या सुरू राहतील, असे उच्च न्यायालयाने बजावले होते. 

याला उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता हे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांत आठवडाभरासाठी संपूर्ण लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे तातडीने या प्रकरणी सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी मेहतांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. यावर आज सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 24 तासांतच स्थगिती मिळाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात मागील 24 तासांत 18 हजार 21 रुग्ण सापडले आहेत. उत्तर प्रदेशात सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाख 8 हजार 523 आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 9 हजार 997 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 6 लाख 61 हजार 311 रुग्ण बरे झाले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख