सुशांतप्रकरणी सर्वोच्च न्यायालय नेमके काय म्हणाले... - supreme court ordered cbi probe in sushant singh rajput case | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतप्रकरणी सर्वोच्च न्यायालय नेमके काय म्हणाले...

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपला आहे. 
 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. याबाबत सर्व सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या तपासावरुन मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला गदारोळ अखेर संपला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवण्यास मुंबई पोलिसांची या प्रकरणातील कार्यपद्धती  जबाबदार ठरली आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालयानेही (ईडी) उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

रिया चक्रवर्तीने बिहारमध्ये दाखल एफआयआर मुंबईला वर्ग करावा यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूप्रकरणी सादर केलेल्या कागपत्रांनुसार प्रथमदर्शनी यात मुंबई पोलिसांनी कोणताही गैरप्रकार केलेला दिसत नाही. मात्र, बिहार पोलिसांच्या पथकाला तपास करण्यात अडथळे निर्माण करण्यात आल्याने यात संशयास्पद वातावरण निर्माण झाले. हे टाळता आले असते. यामुळे रिया चक्रवर्तीसह इतरांविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरची तपास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. 

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही. ते फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 नुसार तपास करीत आहेत. अनैसर्गिक मृत्यूच्या तपासाचे कारण शोधण्यासाठी या कलमांतर्गत चौकशी केली जाते. मुंबई पोलिसांची ही मर्यादित चौकशी सुरू आहे. याचमुळे मुंबई पोलिसांना समांतर तपास करता येणार नाही. सीबीआयने आता हे प्रकरण हाती घेतले आहे. याला याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतलेला नसून, बिहार सरकार आणि पाटणा पोलिसांबाबत आक्षेप घेतला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 

सीबीआयने बिहार सरकारच्या शिफारशीनुसार तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांनी समांतर तपास केल्यास गोंधळ उडण्याची शक्यता आहे. यामुळे सीबीआय चौकशीला परवानगी देण्यात येत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.  

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख