मोठी बातमी : गोकुळची निवडणूक होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा सत्तारुढ गटाला मोठा धक्का - supreme court gives green signal to goukul election | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : गोकुळची निवडणूक होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा सत्तारुढ गटाला मोठा धक्का

सुनील पाटील
मंगळवार, 27 एप्रिल 2021

केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.  

कोल्हापूर : केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदानकेंद्रांची संख्या दुप्पट करून घेण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने 'गोकुळ'च्या 2 मे रोजी होणाऱ्या मतदानातील अडथळाही दूर झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने सत्तारूढ गटाला जबर धक्का बसला आहे.

'गोकुळ' च्या निवडणुकीला स्थगिती मिळावी म्हणून दोन संस्थांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर गेल्या सोमवारी (ता. 19) रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही सुनावणी काल (ता. 26) रोजी सुनावणी होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचे निधन झाल्याने ही सुनावणी रद्द करून ती आज ठेवण्यात आली होती. 

आज सकाळी न्यायाधीश उदय ललित व ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अर्ध्या तासांच्या युक्तीवादानंतर खंडपीठाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देताना मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून मतदान घेण्याचे आदेश देत ही याचिका निकालात काढली. आजच निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी या निवडणुकीसाठी 12 तालुक्‍यात 35 मतदान केंदे जाहीर केली होती. आता यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणखी 35 केंद्रांची वाढ करावी लागणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख