रुग्णालय व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच दहा रुग्णांचा मृत्यू; पोलीस गुन्हा दाखल करणार - sunrise hospital management responsible for death of ten patients | Politics Marathi News - Sarkarnama

रुग्णालय व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच दहा रुग्णांचा मृत्यू; पोलीस गुन्हा दाखल करणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मार्च 2021

भांडूप स्टेशनजवळील ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयात मध्यरात्री भीषण आग लागली. यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.  

मुंबई : भांडूप स्टेशनजवळील ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयात मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 10 कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेला रुग्णालयाचे व्यवस्थापनच जबाबदार असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. 

भांडूप येथील ड्रीम मॉल मध्ये काल (ता.25) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हे कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयात त्यावेळी 84 रुग्ण दाखल होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २४ पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अखेर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.  अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक रुग्णांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. रुग्णालयाला आग लागल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सनराईज रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी बोलताना पोलीस आयुक्त नगराळे म्हणाले की, रुग्णालयात एकूण 84 रुग्ण होते आणि त्यातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल हलवण्या आले आहे अथवा ते घरी गेले आहेत. ही अतिशय गंभीर घटना आहे. यात रुग्णालय व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहोत. 

हेही वाचा : मुख्यमंत्री ठाकरेंची जाहीर माफी अन् पंतप्रधान मोदींना अतीव दु:ख

किरीट सोमय्यांचा महापालिकेवर आरोप 

सनराईज या रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले आहे. ड्रीम्स मॉल म्हणजे घोटाळ्यांचा महाल आहे. आग लागलेल्या सनराईज रुग्णालयाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नव्हते, अशी माहिती मला मिळाली असून, रुग्णालयात कोणतीही अग्निशमन यंत्रणा नव्हती. मात्र, तरीदेखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप सोमय्या यांनी केला. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख