ऊसतोड कामगारांचा संप मिटला...पण तिढा कायम - sugarcane workers strike suspended after meeting with sharad pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ऊसतोड कामगारांचा संप मिटला...पण तिढा कायम

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

राज्यातील ऊसतोड कामगारांनी वाढीव मोबदल्यासाठी संप पुकारला होता. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अखेर या संपावर तोडगा निघाला आहे. 

पुणे : ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी 14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीला सर्व संघटनांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी आज दिली. दरम्यान, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही वाढ कमी असल्याचे सांगत फेब्रुवारीत पुन्हा संप करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे संपावर निघालेला तोडगा किती काळ टिकणार हा प्रश्न आताच निर्माण झाला आहे. 

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्यासह ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या बैठकीनंतर बोलताना दांडेगावकर म्हणाले की, ऊसतोड कामगार, मुकादमांच्या आणि वाहतुकीच्या दरवाढीबाबत दर तीन वर्षांनी करार केला जातो. यंदाचा करार 2020-21 ते 2022-23 पर्यंत तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी 14 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना 35 ते 45 रुपयांची रक्कम वाढवून मिळणार आहे.

राज्यातील साखर कारखान्यांना या दरवाढीसाठी सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये गतवर्षीच्या तुलनेत अधिक द्यावे लागणार आहेत. सर्व संघटनांनी या निर्णय आजच्या बैठकीत मान्यता दिली आहे. महाराष्ट्राला मान्य होणारा हा तोडगा करण्यात आला आहे. राज्यातील गाळप हंगाम सुरु झाला आहे. 

या बैठकीत धस यांना सुरुवातीला प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र, त्यांनी प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केल्यामुळे त्यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला होता. सुरेश धस हे गेले काही दिवस आक्रमकपणे या मजुरांचे प्रश्न मांडत आहेत. तसेच तोडगा निघाल्याशिवाय मजुरांना साखर कारखान्यावर जाऊ नये, असे आवाहन ते करत होते. तसेच ऊसतोड मजुरांच्या मजुरीदरात शंभर टक्‍क्‍यांहून अधिक वाढीची आक्रमक मागणी त्यांनी लावून धरली होती. 

आता सुरेश धस यांनी हा तोडगा मान्य नसल्याचे म्हटले आहे. बैठकीत करण्यात आलेली वाढ कमी असून, फेब्रुवारीत पुन्हा संपाचे हत्यार उपसले जाईल, अशा इशारा दिला त्यांनी आहे. यामुळे आजच्या बैठकीत निघालेल्या तोडगावर लगेचच प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख