केंद्र व राज्य सरकारनं यासाठी एकत्र यावं :  रोहित पवार - Students and parents are not in the mood to take this exam in the corona crisis. | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्र व राज्य सरकारनं यासाठी एकत्र यावं :  रोहित पवार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

कोरोनाचे संकटात या परीक्षा घेण्याबाबत विद्यार्थी आणि पालक यांची सध्या मनस्थिती नाही.

मुंबई : जेईई आणि एनईईटी (JEE & NEET) ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी निर्णायक असतात. कोरोनाचे संकटात या परीक्षा घेण्याबाबत विद्यार्थी आणि पालक यांची सध्या मनस्थिती नाही. परीक्षा घेतली त्यांच्या मानसिकतेवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. केंद्र व राज्य सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत रोहित पवार यांनी टि्वट केलं आहे. 

#ProtestAgainstExamInCOVID च्या माध्यमातून परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मोहीमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जेईई व अन्य परीक्षा घेण्याच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनीही टि्वट केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये मुंडे यांनी म्हटले आहे की देशभरात कोरोनाचं संकट मोठं आहे. कोरोनाशी लढताना सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहे. या कोरोना काळात परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. बहुतांश शैक्षणिक संस्थांमध्ये क्वारांटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थी हे सध्या कोरोनाशी लढत आहे. जेईई व अन्य परीक्षा घेऊ नये, या विद्यार्थ्यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. 

धनंजय मुंडे यांनी #ProtestAgainstExamInCOVID अशी हॅशटॅग देऊन विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अशाच प्रकारचं टि्वट काल केलं होतं. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होतं की मी शिक्षण मंत्र्यांना NEET आणि अन्य परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे. 

आयआयटी प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तत्पूर्वी कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा रद्द केली जावी अशी मागणी करणारी विद्यार्थी संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती, त्या पार्श्वभूमीवर नुकतेच केंद्र सरकारने या दोन्ही परीक्षा ठरल्याप्रमाणे घेण्याचे निश्‍चित केले आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) जेईई मेनसाठीचे प्रवेशपत्र जारी केले असून तब्बल ६.५ लाख विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केले आहे. या परीक्षेसाठी ८.६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. जेईई मेनची परीक्षा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे नियोजन आहे. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यानंतर केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्याचे नियोजन आखण्यात आले असून विद्यार्थ्यांना नवे फेस मास्क आणि हातमोजे देखील देण्यात येतील. 

जेईईसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ १२० जणांनीच शहरे तसेच परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा संस्थने विद्यार्थ्यांना पाच वेळा परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती, यापैकी ९९.०७ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेले केंद्र हे योग्यच असल्याचे म्हटले आहे.
 Edited  by : Mangesh Mahale     
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख