#दार उघड उद्धवा, दार उघड.. भाजपचा घंटानाद...   - Statewide bell ringing agitation by BJP | Politics Marathi News - Sarkarnama

#दार उघड उद्धवा, दार उघड.. भाजपचा घंटानाद...  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

देहू येथे बाळा भेगडे यांनी  ठाकरे सरकारला इशारा दिला की "या घंटा नादाने जर मंदिरे उघडली नाहीत तर हाच या उद्धव सरकारचा कर्दनकाळ ठरेल"

पुणे : मंदिरे उघडण्यासाठी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून भाजपतर्फे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. श्रीक्षेत्र देहू येथे बाळा भेगडे यांनी भव्य घंटानाद आंदोलन करुन ठाकरे सरकारला इशारा दिला की "या घंटा नादाने जर मंदिरे उघडली नाहीत तर हाच या उद्धव सरकारचा कर्दनकाळ ठरेल"

या आंदोलनात पंढरपूर देवस्थानाचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, सुनील महाराज मोरे, रामनाना मोरे, अजित महाराज मोरे, प्रशांत ढोरे, बाळासाहेब काळोखे, सुहासशेठ गोलांडे, शहराध्यक्ष मछिंद्र परंडवल, उपरपंच स्वप्नील काळोखे, संतोष हगवणे, संतोष चव्हाण, संजय जंबुकर, नारायण पचपिंड, महेश दरेकर, सागरभाऊ म्हसदुगे उपस्थित होते. औरंगाबाद येथे भाजपच्या वतीने राज्यभरात घंटानाद आंदोलन सुरू आहे. 

औरंगाबाद येथील पूर्व मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन महाराज मंदिरासमोर घंटानाद करत दार उघड उद्धवा दार उघड अशा घोषणा देत राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी करण्यात आली. शिर्डीत साईबाबांच्या समाधी मंदिरासमोर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांसह शिर्डी ग्रामस्थांनी घंटानाद आंदोलन केलंय यावेळी भाजप खासदार सुजय विखे भाजप कार्यकर्त्यां सह शिर्डी ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. भजन म्हणत घंटा टाळ मृदुंग वाजवत आंदोलन केलं. नागपुरात भाजपचे घंटा नाद आंदोलन आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात साई मंदिरासमोर झाले.

हेही : वाचा पंढरपुरात वारकरी संघटनेत मतभेद.. 
 पंढरपूर : "विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी विश्व वारकरी संघटनेसह बहुजन वंचित आघाडाने केली आहे. याच मागणीसाठी संघटनांनी  31 ऑगष्टला पंढरपुरात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच वारकरी पाईक संघाने आंदोलनाबाबत वेगळी भूमिका जाहीर केल्याने वारकर्यांमध्येच आंदोलना बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण वीर महाराज यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वंचित आणि विश्व वारकरी संघटनेच्या संख्यात्मक आंदोलनाला आमच्या वारकरी संघटनेचा पाठिंबा नसल्याचे आज स्पष्ट केले आहे. पाईक वारकरी संघाने घेतलेल्या या भूमिकेमुळे वारकरी संघटनेतील मतभेद देखील या निमित्ताने समोर आले आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख