विद्यार्थ्यांसाठी खूशखबर...यूपीएससीसाठी अर्थसहाय्य मिळणार - state government will help scheduled caste upsc aspirants financially | Politics Marathi News - Sarkarnama

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर...यूपीएससीसाठी अर्थसहाय्य मिळणार

वृत्तसंस्था
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

राज्य सरकारने यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदापासून विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. 

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी यांनी ही माहिती दिली. 

या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 12 हजार रुपये विद्यावेतन व 14 हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण 26 हजार रुपये देण्यात येणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे, यासाठी आदिवासी विकासमंत्री पाडवी यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रशासकीय अधिकारी व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. आर्थिक सहाय्याअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या अनुसूचित जमातीमधील तरुणांसाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वासही पाडवी यांनी व्यक्त केला आहे.

या योजनेअंतर्गत यूपीएससीच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या 25 व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या 25 अशा अनुसूचित जमातीमधील एकूण 50 उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळेल. ही योजना सन 2020-21 पासून लागू होणार असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख