वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 'असा' आहे राज्य सरकारचा प्रस्ताव - State Government Prepared Proposal to Give relief to Electricity Customers | Politics Marathi News - Sarkarnama

वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 'असा' आहे राज्य सरकारचा प्रस्ताव

राजू सोनवणे
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

लाॅकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना जी बिले आली त्याने बहुतेकांचे डोळे पांढरे झाले होते. ही बिले योग्य आहेत, असे ऊर्जा मंत्री डाॅ. नितीन राऊत सांगत असले तरीही बहुतेकांना ते मान्य नव्हते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षांनी तर यावर खूपच आक्रमक भूमीका घेतली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे

मुंबई : लाॅकडाऊनच्या काळात वीज कंपन्यांनी सरासरी बिले पाठवून वीज ग्राहकांना चांगलाच शाॅक दिला होता. अनेकांना अवाजवी बिले आली होती. त्यावरुन राजकीय टिकाही सरकारवर झाली. आता मात्र राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.

लाॅकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना जी बिले आली त्याने बहुतेकांचे डोळे पांढरे झाले होते. ही बिले योग्य आहेत, असे ऊर्जा मंत्री डाॅ. नितीन राऊत सांगत असले तरीही बहुतेकांना ते मान्य नव्हते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षांनी तर यावर खूपच आक्रमक भूमीका घेतली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

गेल्या वर्षीच्या वापरानुसार होणार आकारणी

राज्य सरकारने तयार केलेल्या प्रस्तावात युनिट वापरानुसार आकारणी करुन सरकार दिलासा देणार आहे. या प्रस्तावानुसार राज्यातील सर्वच वीज ग्राहकांचा यावर्षीच्या एप्रिल, मे, जून या महिन्यातील वीज वापर आणि याच महिन्यांसाठी २०१९ साली केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे. २०१९ साली जेवढा वीज वापर केला असेल तेवढ्याच वापराचे या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात वीज बिल ग्राहकांना भरायचे आहे. त्यावरील वीज वापराचा भार राज्य सरकार उचलणार आहे

१०० युनिटपर्यंतच्या वीज वापरातील तफावत राज्य सरकार पूर्णपणे भरणार आहे.  म्हणजेच गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तुम्ही ८० युनिट वीज वापरली असेल आणि यावर्षी १०० युनिट वीज वापराचे बिल आले असेल तर तुम्हाला ८० युनिटचेच बिल भरायचे आहे. फरकाच्या २० युनिटचे बिल राज्य सरकार भरणार आहे.  याच पद्धतीने जर वीज वापर १०१ ते ३०० युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा ५० टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे, तर वीज वापर ३०१ ते ५०० युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा २५ टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे

अशा पद्धतीने राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज ग्राहकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे. ज्यांनी वीज बिल भरलेले आहे, अशा ग्राहकांच्या पुढील बिलातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. राज्य सरकार केवळ घरगुती वीज ग्राहकांना हा दिलासा देणार आहे . व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू नसणार आहे.  
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख