'या' गावांत पुन्हा रंगणार ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या. आता काही गावांत पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे.
state election commission announces election program for some gram panchayats
state election commission announces election program for some gram panchayats

मुंबई : सरपंच व सदस्यपदाचा लिलाव झालेल्या आणि निष्पक्ष वातावरणात पार न पडलेल्या  ग्रामपंचायत निवडणुका  निवडणूक आयोगाने रद्द ठरवल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नव्या कार्यक्रमानुसार 12 मार्चला मतदान होणार आहे. याबाबतची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी केली आहे. 

मदान म्हणाले की, विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता.देवळा) व कातरणी (ता. येवला), नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) आणि नगर जिल्ह्यातील वाकी (ता. जामखेड) ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नव्या कार्यक्रमानुसार 12 मार्चला मतदान होणार आहे. त्याचबरोबर साकत (ता. जामखेड) ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक  दोनसाठीही याच दिवशी मतदान होईल.

उमराणे, कातरणी आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार होते; परंतु सदस्य व सरपंचपदांच्या लिलावप्रकरणी या तिन्ही ठिकाणी निवडणूक रद्द झाली होती. त्याचबरोबर वाकी ग्रामपंचायतीची आणि साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमधील निवडणूक निष्पक्षपणे पार न पडल्यामुळे ती रद्द करण्यात आली होती, असे मदान यांनी सांगितले. 

आता या सर्वांसाठी नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार 16 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. त्यांची छाननी 24 फेब्रुवारीला होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी असेल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 12 मार्चला होईल व मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी लगेचच मतमोजणी होईल, असे मदान यांनी सांगितले. 

उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाला होता. त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे तक्रारीही आल्या होत्या. त्याअनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. 

खोंडामळी येथील लिलावाप्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नंतर पुढील तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवडणूक आयोगाने दिले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com