शरद पवारांसह अन्य नेत्यांच्या गाड्या रेस ट्रॅकवर पाहून क्रीडा मंत्री संतापले - Sports Minister Kiran Rijiju criticize Political leaders car parking on Race track | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

शरद पवारांसह अन्य नेत्यांच्या गाड्या रेस ट्रॅकवर पाहून क्रीडा मंत्री संतापले

वृत्तसंस्था
सोमवार, 28 जून 2021

शरद पवार यांनी शनिवारी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या जागेची पाहणी केली.

नवी दिल्ली : म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीवेळी पवार यांच्यासह इतरांच्या गाड्या रेस ट्रॅकवर उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यावरून भाजपने (BJP) टीका केली आहे. ट्रॅकवर गाड्या उभ्या असल्याचे पाहून केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. (Sports Minister Kiran Rijiju criticize Political leaders car parking on Race track)

शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या जागेची पाहणी व साधने-सुविधांबाबत शरद पवार यांनी शनिवारी बैठक घेतली. यावेळी क्रीडा-युवक कल्याण मंत्री सुनील केदार व राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यांच्या गाड्या थेट रेस ट्रॅकवर उभ्या असल्याची छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाली.

हेही वाचा : ठाकरे सरकारला संकटात टाकणारे परमबीर सिंग नेमके आहेत कुठे?

त्यानंतर राज्याचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी याबाबत खुलासा करून माफीही मागितली. शरद पवार यांच्या पायाला त्रास होत होता. त्यांना चालण्यास त्रास होऊ नये म्हणून सिमेंट ट्रॅकवर गाड्या उभ्या करण्यासाठी परवानगी दिली होती. पण काही गाड्या रेस ट्रॅकवर उभ्या असल्याबद्दल माफी मागतो, अशी प्रतिक्रिया बकोरिया यांनी दिली होती. पण भाजपकडून या प्रकारावरून जोरदार टीका केली जात आहे. 

केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'आपल्या देशात खेळ आणि खेळाच्या मुल्यांविषयी असा अनादर पाहून मला स्वत:ला खूप दु:ख होत आहे. देशात खेळांच्या सुविधांची कमतरता आहे. त्यामुळं सर्व खेळाच्या ठिकाणांची योग्यप्रकारे काळजी घेण्याची गरज आहे,' असे रिजिजू म्हणाले.

भाजपचे नेते अमित मालवीय यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही टीका केली आहे. क्रीडा आयुक्तांनी माफी मागितली असली तरी महाविकास आघाडीतील नेते कधी माफी मागणार, असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख