काँग्रेसच्या 20 नेत्यांचं 'यासाठी' सोनिया गांधीना पत्र.... - Some senior Congress leaders have demanded some major changes in the party. | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या 20 नेत्यांचं 'यासाठी' सोनिया गांधीना पत्र....

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑगस्ट 2020

काँग्रेसच्या 20 नेत्यांनी सोनिया गांधी यांना याबाबत पत्र लिहिले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत चर्चा करण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारीणीची सोमवारी (उद्या) बैठक होत आहे. या बैठकीपूवी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी पक्षात काही मोठे बदल करण्याची मागणी केली सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. या काँग्रेसच्या 20 नेत्यांनी सोनिया गांधी यांना याबाबत पत्र लिहिले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत चर्चा करण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे. 

काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ही बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे. कोरोनाच संकट, राजकीय विषय, अर्थव्यवस्था आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. पक्षनेतृत्वाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची मागणी काँग्रेसच्या या 20 नेत्यांनी केली आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की काँग्रेसच्या शंभर टक्के कार्यक्रर्त्यांना वाटते की राहुल गांधी यांनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारून अध्यक्षपदी विराजमान व्हावे. 

काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्याच्या बाहेरील असावा, असे मत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यापूर्वी व्यक्त केलं आहे.  या विषयावर रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनीही प्रसारमाध्यमांनी बोलताना याविषयी आपले मत व्यक्त केलं आहे.  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कार्यकाळाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे.  त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने पक्षाचे अध्यक्षपद रिकामे राहणार की काय अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. 

काँग्रेसचे नेते शशि थरुर यांनी पक्षाने पूर्ण वेळ अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी भूमिका घेतली होती. यावरुन काँग्रेसच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली होती. त्यांनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाने तातडीने पूर्ण वेळ अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. परंतु, त्यांचीच पद स्वीकारण्याची इच्छा नसेल तर पक्षाने दुसरा पर्याय शोधालयला हवा. पक्षाला पुढील वाटचाल करण्यास पूर्ण वेळ अध्यक्षाची गरज आहे. 

सोनिया गांधी यांचा हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपला आहे. त्यांनी हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मुदत संपली असली तरी अध्यक्षपद आपोआप रिकामे होणार नाही. सोनिया गांधी या हंगामी अध्यक्षा आहेत. नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहतील. ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे मात्र, ती तातडीने पूर्ण होईल, अशी शक्यता नाही, असे पक्षाने याआधी स्पष्ट केले होते. 

काँग्रेस कार्यकारी समितीच्या माध्यमातून नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया राबवली जाईल. आगामी काळात लवकरच ही प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न असून, त्याचा निकाल सर्वांसमोर मांडण्यात येईल. याबाबतची प्रक्रिया काँग्रेसच्या घटनेत लिहिलेली आहे. पक्षाने तिचे पालन करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर याबाबतची माहिती सर्वांना दिली जाईल, असे पक्षाने म्हटले होते. 
 Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख