पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसेचे गालबोट..मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रकार - some incidents of violence reported in west bengal assembly election first phase | Politics Marathi News - Sarkarnama

पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसेचे गालबोट..मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रकार

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मार्च 2021

पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 30 जागांसाठी आज मतदान झाले. 

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी आज मतदान झाले. काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपने मतदानात अडथळे आणल्याचा आरोप एकमेकांवर केला आहे. मतदानाच्या टक्केवारीतील अनियमिततेवरून तृणमूलने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. 

आज बंगालमध्ये मतदानादरम्यान काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. पश्‍चिम मिदनापूरमधील भाजपचे उमेदवार समित दास यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर गोंधळ घातल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, मिदनापूर शहरात मतदान शांततेत सुरू होते. मात्र, ग्रामीण भागात काही ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मतदानात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. काही मतदान केंद्रात घुसून मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न तृणमूलने केला. आम्ही निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करणार आहोत. 

मतदानाच्या टक्केवारीतील अनियमिततेचा गंभीर आरोप तृणमूलने केला आहे. याबाबत तृणमूलने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, कांठी दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजून 13 मिनिटांनी अनुक्रमे 18.47 व 18.95 टक्के मतदान होते. परंतु, चार मिनिटांनंतर म्हणजेच 9 वाजून 17 मिनिटांनी मतदानात घट होऊन ते अनुक्रमे 10.60  व 9.40 टक्क्यांपर्यंत खाली आले. 

राज्यसभेतील तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. मतदानातील या तफावतीने आयोगाच्या आकडेवारीवर शंका उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपने मतदान केंद्रांवर ताबा मिळविल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. मतदान केंद्र प्रतिनिधीसाठी संबंधित व्यक्ती त्या मतदारसंघातील मतदार असण्याची अट रद्द करण्याची मागणीही तृणमूलने केली आहे. तृणमूलचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या दहा खासदारांच्या गटाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. सध्याच्या व्यवस्थेबद्दल त्यांनी तक्रार दाखल केली आहे. 

तृणमूलच्या आरोपांवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, तृणमूलला पराभव समोर दिसू लागल्याने त्यांच्याकडून आरोप करण्यात येत आहेत. ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्षावर दबाव आल्यानेच ते विनाकारण तक्रारी करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख