दुसऱ्या पत्नीच्या आरोपांवर धनंजय मुंडे म्हणतात, यामागे माझ्या बदनामीचाच हेतू... - social welfare minister dhananjay munde clarifies about karuna sharma allegations | Politics Marathi News - Sarkarnama

दुसऱ्या पत्नीच्या आरोपांवर धनंजय मुंडे म्हणतात, यामागे माझ्या बदनामीचाच हेतू...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दुसऱ्या पत्नीने आरोप केले आहेत. यावर त्यांनी आपली बाजू मांडली आहे.    

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्धची बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी नुकतीच मागे घेतली होती. त्यानंतर आता रेणू शर्मांची मोठी बहीण व मुंडेंची दुसरी पत्नी करुणा शर्माने आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मागील तीन महिन्यांपासून मुडेंनी मुलांना डांबून ठेवल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. यावर मुंडेंना खुलासा करीत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

यावर मुंडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी पूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांना मनाई आदेशही दिला आहे. 

हा तर रावणापेक्षाही अत्याचारी...मुंडेंच्या दुसऱ्या पत्नीचा आरोप

त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मिडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ताहिलरामानी यांची मिडिएटर म्हणुन नियुक्तीही केली आहे. या मिडिएशनच्या दोन बैठका झालेल्या असून, 13 फेब्रुवारीला पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मिडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर  सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत, असे मुंडेंनी म्हटले आहे.  

असे असताना आणि सहमतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मिडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे. मुळात जो मुद्दा मिडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतू दिसून येतो. कृपया ही बाब न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे या प्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही, असे मुंडेंनी स्पष्ट केलं आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख