'महिला-बालविकास'चे भ्रष्ट कारनामे सेनेकडून थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी - Sivsena sent Complaints about Women and Child Development Departments to CM Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

'महिला-बालविकास'चे भ्रष्ट कारनामे सेनेकडून थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

संजय मिस्किन
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

संबंधित अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या नावाने एक बचत गट स्थापन केला. या बचत गटामार्फत २०१५-१६ मध्ये एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत पोषण आहार, कराटे प्रशिक्षण, ब्युटी पार्लर आदी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे पुरावे असल्याचा दावा करत सर्व कागदपत्रे भागवत वंगे यांनी निवेदनासोबत जोडलेली आहेत.

मुंबई : 'प्रहार'ने उजेडात आणलेल्या बाह्य स्त्रोतांच्या (आउट सोर्सिंग) कर्मचारी पद भरतीमुळे अडचणीत सापडून वादग्रस्त ठरलेल्या महिला व बालविकास विभागातील भ्रष्ट कारनाम्यांची दखल आता शिवसेनेही घेतली आहे. या विभागातील वरकमाईला चटावलेल्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट आणि मस्तवाल कारभाराच्या नाना करामती सेनेकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरबारी मांडल्या आहेत.

परभणीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी म्हणून बदलून आलेले संबंधित अधिकारी लातूर जिल्हा परिषदेच्या बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी होते. या पदावर असताना त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे रेणुका बचत गट स्थापन करून कोट्यवधी रुपयांची बोगस बिले मंजूर केली असल्याचा आरोप लातूरच्या शिवसेना तालुका प्रमुख भागवत वंगे यांनी केला आहे. या अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचा तब्बल २२ पानी लेखाजोखा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. 

संबंधित अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या नावाने एक बचत गट स्थापन केला. या बचत गटामार्फत २०१५-१६ मध्ये एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत पोषण आहार, कराटे प्रशिक्षण, ब्युटी पार्लर आदी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे पुरावे असल्याचा दावा करत सर्व कागदपत्रे भागवत वंगे यांनी निवेदनासोबत जोडलेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांना आवश्‍यक साधन सामुग्री पुरविण्यात येतात. या विविध प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यासाठी खास मर्जीतील कंत्राटदारांच्या निविदा 'अर्थ'पूर्ण व्यवहाराने मंजूर केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. पुरवठाधारकांकडून बक्‍कळ मलिदा लाटणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या पत्नींच्या नावे स्थापन केलेल्या बचत गटाचा पोषण आहार निर्मितीचा प्रकल्प असल्याचे भासवले. प्रत्यक्षात तो प्रकल्प कागदावर दाखवून शासनाची दिशाभूल केली. या बेकायदेशीर कामांतून करोडोंची हेराफेरी करत स्थावर व जंगम मालमत्ता जमवली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे

पद भरतीत अक्षम्य कुचराई करून आपले उखळ पांढरे करणाऱ्या परभणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना विभागीय चौकशीत दोषी ठरवत त्यांच्यावर अनियमिततेचा ठपका ठेवल्याचे वृत्त मंगळवारी (ता.११) 'सकाळ'मधून झळकताच राज्यभरातील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. कमी अधिक प्रमाणात सर्वच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात 'आऊट सोर्सिंग'मध्ये 'अर्थ'पूर्ण व्यवहार झाले असल्याने या साऱ्याच्याच पोटात गोळा आला असून, चौकशीचा 'प्रहार'आपल्यावरही होईल, या भीतीने झोप उडाली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख