'निर्णायक बदल' : अदर पूनावालांनी मानले मोदी अन् सीतारामन यांचे आभार - SII ceo adar poonawalla thanks narendra modi and nirmala sitharaman | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

'निर्णायक बदल' : अदर पूनावालांनी मानले मोदी अन् सीतारामन यांचे आभार

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 एप्रिल 2021

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, सरकारने केलेल्या उपाययोजनांचे अदर पूनावाला यांनी स्वागत केले आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला 3 हजार कोटी रुपये आणि भारत बायोटेकला दीड हजार कोटी रुपयांचा कर्जाऊ केंद्र सरकारने निधी दिला आहे. याचबरोबर केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना 1 मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या धोरणातील या निर्णायक बदलाचे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी स्वागत केले आहे. 

देशात लशीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आम्हाला लस उत्पादन वाढवण्यासाठी 3 हजार कोटी रुपये द्या, अशी मागणी अदर पूनावालांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांनी म्हटले होते की, आम्हाला 3 हजार कोटींचा निधी मिळाल्यास लशीचे उत्पादन तीन महिन्यांत वाढू शकेल. याबाबत आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बँकांकडे कर्जासाठी जाऊ. 

आता केंद्र सरकारने पूनावालांची मागणी मान्य केली आहे. देशातील लस उत्पादनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने सिरमला 3 हजार कोटी रुपये आणि भारत बायोटेकला 1 हजार 500 कोटी रुपयांचा कर्जाऊ निधी दिला आहे. याबद्दलच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज तत्वत: मंजुरी दिली. आता संबंधित मंत्रालयाच्या माध्यमातून दोन्ही कंपन्यांकडे हा निधी पोचणार आहे. लवकरात लवकर हा निधी कंपन्यांना पोचेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.  

याबद्दल बोलताना अदर पूनावाला म्हणाले की, देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय आणि लस उत्पादक कंपन्यांना निधी देणे याचा फायदा लस उत्पादन आणि वितरणाला होणार आहे. सरकारच्या धोरणातील हा निर्णायक बदल स्वागतार्ह आहे. लस उद्योगाच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख