देशातील कोरोना लस टंचाई आणखी दोन ते तीन महिने राहणार; अदर पूनावालांचे मोठे विधान - SII ceo adar poonawalla says shortage of covid vaccine will remain for 2 to 3 months | Politics Marathi News - Sarkarnama

देशातील कोरोना लस टंचाई आणखी दोन ते तीन महिने राहणार; अदर पूनावालांचे मोठे विधान

वृत्तसंस्था
सोमवार, 3 मे 2021

देशात कोरोना लशीची टंचाई असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लशीची टंचाई पुढील दोन ते तीन महिने राहील, असा अंदाज आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. परंतु, देशात लशीची टंचाई असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. आता जगातील आघाडीची लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी कोरोना लशीची टंचाई पुढील दोन ते तीन महिने राहील, असा अंदाज वर्तविला आहे. यामुळे सरकारच्या कोरोना लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. 

देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत असताना आता लशीच्या टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना लसीकरण खुले केल्यानंतर नेमकी लशीची कमतरता जाणवत आहे. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केवळ औपचारिकरीत्या ही मोहीम सुरू ठेवली आहे. वेळीच नागरिकांचे लसीकरण न झाल्यास कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

याबद्दल बोलताना अदर पूनावाला म्हणाले की, लशीची टंचाई जुलैपर्यंत कायम राहील. जुलैमध्ये लशीचे उत्पादन दरमहा 6 ते 7 कोटी डोसवरुन 10 कोटी डोसवर जाईल. सरकारला कोरोनाचा दुसरी लाट एवढी मोठी येईल, याचा अंदाज नव्हता. कोरोना महामारीला आपण हरवले अशीच भावना आधी होती. विनाकारण आम्हाला लक्ष्य केले जात आहे. आधी आम्हाला दिलेल्या ऑर्डरनुसार वर्षाला केवळ 1 अब्ज डोसचे उत्पादन होणार होते. परंतु, नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागणी वाढली. आता लशीच्या टंचाईसाठी आम्हाला जबाबदार धरले जाऊ लागले आहे. 

18 वर्षांवरील व्यक्ती 1 मेपासून कोरोना लस घेण्यास पात्र आहेत. ते सरकारच्या को-विन प्लॅटफॉर्मवर आता नाव नोंदवू शकतात. नाव नोंदवल्यानंतर ते लसीकरण केंद्रावर जाऊन नियोजित वेळी लस घेऊ शकतात. केंद्र सरकारने सर्वांना लस देण्याची घोषणा केली. कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख