कृपया, आम्हाला मदत करा! अदर पूनावालांचे थेट अमेरिकेच्या अध्यक्षांना साकडे

अमेरिका आणि युरोपने कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल रोखून धरला आहे.
SII ceo adar poonawalla requests us president for help in import of raw material
SII ceo adar poonawalla requests us president for help in import of raw material

नवी दिल्ली : देशात कोरोना लशीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच अमेरिका आणि युरोपने कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल रोखून धरला आहे. यामुळे लशीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी थेट अमेरिकेच्या अध्यक्षांकडे मदतीची याचना केली आहे. 

अदर पूनावाला यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे आदरणीय अध्यक्ष, आपण सर्वांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करीत आहे. अमेरिकेने लशीच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध उठवावेत. असे घडल्यास लस उत्पादनाचा वेग वाढेल. तुमच्या प्रशासनाकडे यासंदर्भातील सर्व तपशील आहेत. 

याआधी पूनावाला यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, युरोप आणि अमेरिकेने कोरोना लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे भारतातील कोरोना लशीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मला शक्य असते तर मीच अमेरिकेत जाऊनही याचा निषेध नोंदवला असता. अमेरिका आणि युरोपने भारत आणि इतर देशांतील कोरोना लस उत्पादनासाठीचा कच्चा माल रोखून धरला आहे. 

हा कच्चा माल सद्य:स्थितीत अतिशय आवश्यक आहे. हा माल आपल्याला तातडीने हवा आहे. तो सहा महिने अथवा वर्षाने नको आहे. एवढा वेळ असता तर आपणच दुसऱ्या पुरवठादारांकडून हा माल तयार करुन घेतला असता. कोव्हिशिल्डसोबत कोव्हॅक्सिनच्या उत्पादनावरही याचा परिणाम झाला आहे. हा माल चीनमधून आयात करण्याचा कोणताही विचार नाही. कारण त्या मालाच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित होतो, असे पूनावाला यांनी म्हटले होते. 

देशभरात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर गेले आहेत. देशातील रुग्णसंख्या दररोज दोन लाखांचा टप्पा ओलांडू लागली आहे. याचबरोबर कोरोनाने होणारे मृत्यूही वाढले आहेत. देशात लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी लशीच्या टंचाईमुळे लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com