मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा पहिलाच दसरा मेळावा...पण शिवाजी पार्कवर नाही

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची शिवसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, यंदा हा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही.
Shivsena will hold Dassehra rally in auditorium not at Shivaji Park
Shivsena will hold Dassehra rally in auditorium not at Shivaji Park

मुंबई : दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानात होणारा शिवसेनेचा भव्यदिव्य दसरा मेळावा यावर्षी मात्र तेथे होणार नाही. याला कारण आहे कोरोना महामारीचे. शिवसैनिक आतुरतेने दसरा मेळाव्याची वाट पाहत असतात. मात्र, यंदा तो सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त  ५० जणांच्या उपस्थितीत होणार आहे. यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. हा मेळावा उद्या (ता.25) शिवाजी पार्क परिसरातीलच स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणार आहे. 

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरक्षा उपाययोजना जाहीर केल्या होत्या. यात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होतो. त्यावेळी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमतात. एवढा मोठा जनसमुदाय जमल्यास सरकारनेच घालून दिलेल्या नियमांचा भंग होणार असल्याने हा मेळावा शिवाजी पार्कवर न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (ता.27) सायंकाळी ६.३० वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भाषण सुरू करून मुख्यमंत्री ठाकरे जनतेला संबोधित करतील. या मेळाव्याला शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख नेते असे मोजकेच निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. 

या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण शिवसेनेच्या सोशल मीडिया हँडलवरुन होणार आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा असणार आहे. उद्धव ठाकरे हे 27 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. मात्र, ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाल्यापासून दसरा मेळावा हा पक्षासाठी सर्वांत महत्वाचा कार्यक्रम मानला जातो. 

यंदाचा मेळावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री या नात्याने संबोधित करणार असल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तर या मेळाव्याला महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थित असतील. 

शिवसेना भाजप युतीच्या सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दसरा मेळाव्याला उपस्थित होते. यामुळे आता महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com