..मग राणे अंकुश राणेंच्या हत्येबद्दल का बोलत नाहीत? विनायक राऊतांचा तिखट सवाल - Shivsena MP Vinayak Raut Criticism on Narayan Rane | Politics Marathi News - Sarkarnama

..मग राणे अंकुश राणेंच्या हत्येबद्दल का बोलत नाहीत? विनायक राऊतांचा तिखट सवाल

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

महाविकास आघाडीचे सरकार फारतर सप्टेंबर किंवा आॅक्टोबरपर्यंत चालेल या नारायण राणेंच्या विधानाबाबत राऊत म्हणाले, "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. नारायण राणे यांनी टूरटूर करत रहावं. महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे काढेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले

कणकवली : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तत्परतेने पत्रकार परिषद घेणारे नारायण राणे आपल्या चुलत भावाच्या हत्येच्या प्रकरणात ब्र काढत नाहीत. मात्र, सुशांतसिंह प्रकरणात टाहो फोडून रडतात," अशी बोचरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी येथे केली.

राऊत म्हणाले, ''सुशांतसिंग सिह आत्महत्या प्रकरणी नारायण राणे यांनी तत्परतेने पत्रकार परिषदेत घेतली. सुशांतसिंग आणि तिची सेक्रेटरी यांची हत्याच झाली अशी ठामपणे राणे यांनी सांगितलं. मला त्यांना एक विचारायचं आहे की, नारायण राणे यांचा भाऊ अंकुश राणेंच्या हत्येबद्दल अजून चकार शब्द कोणी काढलेला नाही. स्वतःच्या चुलत भावाची हत्या झाली तरी चालेल  त्याबाबत ब्र देखील काढायचा नाही. पण सुशांतसिंग सिहच्या हत्येच्या बाबतीत टाहो फोडून रडायचं,'' २००५ पासून कणकवलीमध्ये किती हत्या झाल्या, याबाबत गृह राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी तपास करावा अशी मागणीही विनायक राऊत यांनी केली. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राच्या मंत्र्याचे नांव सर्वोच्च न्यायालयात घेतले गेले. या मंत्र्याने राजीनामा देणे योग्य ठरणार नाही काय, असा सवाल राणे यांचे पूत्र नितेश यांनी विचारला होता. त्याचाही समाचार विनायक राऊत यांनी घेतला. ते म्हणाले,'' सुप्रीम कोर्टामध्ये राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचे नाव कधी नोंदलं गेलं,याबाबत निलेश राणे यांनी कधी शोध लावला माहीत नाही. सुप्रीम कोर्टाकडून वेगळे आदेश येतील त्यावेळी महाराष्ट्र सरकार योग्य ती कारवाई करेल पण मात्र कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकार गेलेलं आहे,"

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

महाविकास आघाडीचे सरकार फारतर सप्टेंबर किंवा आॅक्टोबरपर्यंत चालेल या नारायण राणेंच्या विधानाबाबत राऊत म्हणाले, "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. नारायण राणे यांनी टूरटूर करत रहावं. महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे काढेल,'' 

राणे सत्तेसाठी रंग बदलणारे नेते

नाणार रिफायनरीबाबत राणे यांनी घेतलेल्या भूमीकेवरही राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, "नारायण राणे यांना सुद्धा आता कंठ भुटू लागला आहे. त्यांना पण रिफायनरी हवीशी झाली आहे. नारायण राणे काय नितेश राणे काय यांनी राजापूरच्या कात्रादेवीच्या साक्षीने शपथ घेतली होती, की रिफायनरी होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत संन्यास घेऊ पण रिफायनरीचे समर्थ करणार नाही. नारायण राणे सत्तेसाधी रंग बदलणारे नेते आहेत," 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख