....आता शिवसेना आमदार रुसले? - Shivsena MLA's Express Unhappiness about NCP | Politics Marathi News - Sarkarnama

....आता शिवसेना आमदार रुसले?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

महाविकास आघाडीत या आधीची कुरबुरी झाल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या, लाॅकडाऊनचे निर्णय तसेच अन्य महत्त्वाचे निर्णय याबाबत आघाडीच्या घटक पक्षांमध्ये नाराजी नाट्य घडले आहे. विशेषतः काँग्रेसचे मंत्री शिवसेनेवर नाराज असल्याचे विविध घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. त्यात आता शिवसेनेच्या आमदारांच्या नाराजीची भर पडली आहे

मुंबई : महाविकास आघाडीत सगळे काही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांकडून वारंवार होत असला तरी प्रत्यक्षात स्थिती तशी नाही, हे अनेक वेळा समोर येत आहे. आता शिवसेना आमदारांची नाराजी समोर आली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या झालेल्या बैठकीत ही नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

काल शिवसेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी 'झूम'द्वारे घेतली. कोरोना मुळे केले गेलेले लाॅकडाऊन, स्थानिक राजकारण अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. त्यात काही आमदारांनी नाराजीचा सूर काढला. राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्या आमदारांची कामे पटापट होतात, व आमच्या कामांना हवी तशी गती मिळत नाही, अशी नाराजी या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्याचे समजते. 

महाविकास आघाडीत या आधीची कुरबुरी झाल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या, लाॅकडाऊनचे निर्णय तसेच अन्य महत्त्वाचे निर्णय याबाबत आघाडीच्या घटक पक्षांमध्ये नाराजी नाट्य घडले आहे. विशेषतः काँग्रेसचे मंत्री शिवसेनेवर नाराज असल्याचे विविध घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. त्यात आता शिवसेनेच्या आमदारांच्या नाराजीची भर पडली आहे. या आमदारांनी आपली कामे होत नसल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडे बोट रोखले आहे. 

दुसरीकडे भाजपचे नेते व राज्यसभा सदस्य नारायण राणे महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. या सरकारमध्ये एकमत नाही. सगळेच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहेत, असे सांगत हे सरकार फारतर सप्टेंबर किंवा आॅक्टोबरपर्यंत चालेल असा दावा कालच राणे यांनी केला होता. भाजपमधील आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र आमचे आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. उलट भाजपचेच आमदार आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राजकीय गोंधळ उडवून दिला आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख