आमदार सरनाईकांच्या पुत्राची पाच तास कसून चौकशी..उद्याही चौकशीचा फेरा - shivsena mla pratap sarnaik son vihang questioned by ed for five hours | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार सरनाईकांच्या पुत्राची पाच तास कसून चौकशी..उद्याही चौकशीचा फेरा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने आज केलेल्या कारवाईवरुन मोठा गदारोळ सुरू आहे. त्यांचे पुत्र विहंग यांची आज पाच तास चौकशी करण्यात आली. 
 

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयांवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला आहे. ईडीने सरनाईक यांचे पुत्र विहंग यांची आज पाच तास कसून चौकशी केली आहे. चौकशी झाल्यानंतर ते ठाण्याला रवाना झाले. विहंग यांची उद्या पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने विहंग सरनाईक यांची आज ५ तास चौकशी केली. त्यांच्याकडून १० कंपन्यांसंदर्भातील प्राथमिक माहिती घेण्यात आली आहे. त्यांच्याशी संबंधित कंपन्यांचे सगळे व्यवहार तपासले जाणार आहेत. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा त्यांनी चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. आज छाप्यात जप्त केलेल्या कागदपत्रांच्या अभ्यास करून पुन्हा एकदा यासंदर्भात प्रश्नावली तयार करून चौकशी होणार आहे. 

आमदार सरनाईक यांच्या मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालय आणि घरी ईडीने आज सकाळी छापा टाकत कारवाई केली होती. दहा ठिकाणी छापा टाकून कारवाई केल्यानंतर सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोचले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांची चौकशी सुरू केली होती. 

ईडीने सकाळी घरावर छापे टाकल्यानंतर आमदार सरनाईक यांनी सायंकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ईडीने आमच्यावर छापे का टाकले हे मलाच माहीत नाही. मी या कारवाईबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या छाप्यांप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने एकूण 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात प्रताप सरनाईक यांचे घर, मुलांचे घर, कार्यालये ही ठिकाणे असल्याचे समजते. परदेशात पैसे पाठवल्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

या कारवाईमुळे शिवसेनेचे नेते प्रचंड संतापले असून त्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. सरनाईक हे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आक्रमक होते. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची नोटीसही सरनाईक यांनीच दिली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख