केलं तुका झालं माका अन् बॉम्ब शेवटी विरोधकांच्या हातातच फुटला! - shivsena leader sanjay raut slams bjp over susension of 12 mlas | Politics Marathi News - Sarkarnama

केलं तुका झालं माका अन् बॉम्ब शेवटी विरोधकांच्या हातातच फुटला!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जुलै 2021

भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या बारा सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. यावरुन गदारोळ सुरू आहे. 

मुंबई : विधिमंडळात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना आईबहिणीवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या (BJP) बारा सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. यावर शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Jadhav) यांनी या विरोधकांना सुनावले आहे.  विरोधकांचे केलं तुका झालं माका असं झालं आणि आमच्यावर टाकायला आणलेला बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला, असा टोला राऊत त्यांनी लगावला. 

संजय राऊत म्हणाले की, सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. केलं तुका झालं माका, अशी कोकणात म्हण आहे. या म्हणीप्रमाणे घडले आणि ते आमच्यावर बॉम्ब टाकणार पण तो त्यांच्या हातातच फुटला. एक चूक किती महागात पडू शकते हे त्यांच्या आता लक्षात आलं असेल. भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्याचा कारण काय? मी सभागृहात नव्हतो पण विरोधक कशाप्रकारे वागले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. 

विरोधक वेलमध्ये गेले आणि गोंधळ घातला. विरोधकांनी तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधवांना शिवीगाळ करुन  धक्काबुक्की केली. त्यामुळेच त्या सदस्यांचे निलंबन केले आहे. अशी कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत आणि उत्तर प्रदेश-बिहारमध्ये सभागृहात दंगली आपण पाहिल्या आहेत. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधीही घडले नाही. महाराष्ट्रात असे प्रकार पुढे होऊ नयेत म्हणून हा निर्णय घेतला असेल.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयात जाऊनही निलंबन रद्द होणार नाही; भुजबळांनी सांगितलं कारण 

बेळगाव महापालिकेवर भगवा की पिवळा झेंडा फडकवायचा यावरून वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत राऊत म्हणाले की, त्यांची पिवळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी पुन्हा बेळगावला जाणार आहे. गोंधळ घालणाऱ्यांनी गोंधळच घालायचा असेल तर बेळगावसाठी संसदेत आणि संसदेच्या बाहेर गोंधळ घालावा. 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांत काल (ता.5) जोरदार चकमक झाली. काही सदस्यांनी डायसवरून माईक हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या केबिनमध्ये बैठक झाली. तेथे जाधव यांना शिवीगाळ झाली. या प्रकरणी भाजपचे आमदार गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, राम सातपुते, जयकुमार रावळ, नारायण कुचे, किर्तीकुमार बांगडिया, पराग आळवणी, हरिष पिंपळे, योगेश सागर यांना एक वर्षासाठी निलंबित कऱण्यात आले. तसेच त्यांना मुंबई आणि नागपूरच्या विधानभवनाच्या आवारात येण्यास मनाई घातली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख