बिहारमध्ये बहुमताचा आकडा कमी जास्त होऊन काहीही घडू शकतं; संजय राऊतांचे भाकित - shivsena leader sanjay raut says majority in bihar can change | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये बहुमताचा आकडा कमी जास्त होऊन काहीही घडू शकतं; संजय राऊतांचे भाकित

वृत्तसंस्था
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार हेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या निकालाबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी वेगळेच संकेत दिले आहेत. 

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. याचवेळी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीचा पराभव झाला आहे. शिवसेना नेते व खासदार यांनी बिहारमध्ये बहुमताचा आकडा कमी-जास्त होऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीही घडू शकते, असे भाकित केले आहे. यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या एकाही जागेवर डिपॉझिट वाचू शकले नाही, असा टोला लगावला आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली होती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. 

राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांका वर 74 जागांसह भाजप आहे. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

बिहारच्या निकालाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, एनडीएने मॅच जिंकलीय, पण मॅन ऑफ द मॅच तेजस्वीच ठरला आहे. भाजप याचा आनंदोत्सोव साजरा करत असेल तर तो विनोद आहे. चिराग पासवान यांच्यामुळे नितीशकुमारांचे २० उमेदवार पडले. एनडीएला काठावरचे बहुमत आहे. बहुमत चंचल असते आणि ते किती स्थिर असेल याची खात्री नाही. तेजस्वी यांनी राजकारणाला वेगळी दिशा दिली आहे. ते २०२४ लोकसभा निवडणुकीत खूप काही करू शकतील. आता पराभूत झालेले नितीशकुमार मुख्यमंत्री होत आहेत. 

विजयाचे मोदींइतकेच श्रेय देवेंद्र फडणवीस यांना आहे. आमची टांग उपरच असते. जेव्हा ती हलायला लागेल तेव्हा भूमंडल हलायला लागेल. बिहार अस्थिर दिसत आहे. बहुमताचा आकडा कमी जास्त होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीही होऊ शकते, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की,  संजय राऊत आणि शिवसेनेने आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मोठा गाजावाजा केला होता की ५० जागा लढवणार. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे प्रचारासाठी जाणार होते त्याचे काय झालं? त्यांच्या एकाही जागेच डिपॉझिट वाचले नाही. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख