रावणाचे दहन 2024 मध्ये पूर्ण होणार! संजय राऊतांची भविष्यवाणी

रावणाचे 2024 मध्ये पूर्ण दहन होईल, अशी भविष्यवाणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
रावणाचे दहन 2024 मध्ये पूर्ण होणार! संजय राऊतांची भविष्यवाणी
Sanjay RautFile Photo

मुंबई : उद्या दसरा असून, रावणाचे (Ravana) दहन सुरू होईल. 2024 मध्ये रावणाचे दहन पूर्ण झालेले असेल, अशी भविष्यवाणी शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. देशात सध्या इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर राऊतांनी ही भविष्यवाणी केली असली तरी याचा संदर्भ देशातील 2024 च्या निवडणुका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडला जात आहे.

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर राऊत यांना पत्रकारांनी विचारले होते. उद्या दसरा असून, पेट्रोल आणि डिझेलच्या रावणाचे दहन सुरू होईल. दसऱ्याला आपण एका रावणाचे दहन करू. देशात 2024 ला रावणाचे दहन पूर्णपणे झालेले असेल, असे राऊत यांनी सांगितले. विशेष म्हणजे देशातील लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 मध्ये होत आहे.

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चालू महिन्यात 12 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशात इंधन दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव प्रतिबॅरल 84 डॉलरपर्यंत पोचले होते. ही मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. काल तो 73 डॉलरवर आला आहे. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे. आगामी काळात हे चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut
पोलीस मंत्रिपुत्राला घटनास्थळी घेऊन गेले अन् दाखवलं कसं शेतकऱ्यांना चिरडलं!

देशभरात आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 35 पैसे तर डिझेलच्या दरात 35 पैसे वाढ करण्यात आली. सध्या देशात इंधनाचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली होती. आता डिझेलच्या दरानेही शंभरी ओलांडण्यास सुरवात केली आहे. अशातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर पोचली आहे.

Sanjay Raut
दिवाळीच्या तोंडावर वाहनचालकांसह गृहिणींचं बजेट कोलमडलं!

दिल्लीत आज पेट्रोलचा दर 104.79 रुपये तर मुंबईत 110.75 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 93.52 रुपये आणि मुंबईत 101.40 रुपयांवर पोचला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे. मागील दोन आठवड्यांत 13 वेळा आणि तीन आठवड्यांत 16 वेळा पेट्रोल, डिझेलची दरवाढ झाली आहे. 24 सप्टेंबरपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 4.9 रूपये आणि डिझेलच्या दरात 3.9 रूपये वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in