कंगना या विषयावर आता बोलणार नाही; संजय राऊत यांची भूमिका - shivsena leader sanjay raut said we have stopped talking about the kangana ranaut issue | Politics Marathi News - Sarkarnama

कंगना या विषयावर आता बोलणार नाही; संजय राऊत यांची भूमिका

वृत्तसंस्था
रविवार, 13 सप्टेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. आज तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना या वादात ओढले आहे. 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ अद्याप संपलेला नाही. कंगना आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात रोज जोरदार सामना रंगत असल्याचे चित्र आहे. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरत आहेत. अखेर संजय राऊत यांनी कंगनावर न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर या मागील कर्ता करविता कोण आहे, हे सर्वांना माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

कंगनाने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेने तिला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा दिला होता. कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले होते. यावर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना लक्ष्य केले होते. 

कंगनाच्या बंगल्याचा भाग पाडल्यानंतर संतापून तिने ट्विटरवर मुंबई महापालिकेच्या विरोधात मोर्चा उघडला होता. तिने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी केलेली तुलना योग्य असल्याचा दावा केला होता. तिने म्हटले होते की, ही इमारत माझ्यासाठी राम मंदिराप्रमाणे होती. आज तेथे बाबर आला आहे. आज पुन्हा इतिहास घडत असून, मंदिर पाडले जात आहे. परंतु, लक्षात ठेवा मंदिर पुन्हा बनेल. जय श्री राम! 

कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले आहेत. ते कंगनाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला आणि राज्य सरकारला लक्ष्य करीत आहेत. कंगनाने आज राजभवनावर जाऊन थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची कंगनाने भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही कंगनाबाबत बोलणे थांबवले आहे. या प्रकरणात कोण काय करीत आहे आणि त्याचे काय परिणाम होत आहेत हे आम्ही पाहत आहोत. कोणता राजकीय पक्ष आणि व्यक्ती आपल्या महान राज्याबद्दल काय विचार करतात हेही या प्रकरणामुळे सर्वांसमोर आले आहे. 

संसदेच्या आगामी अधिवेशनात मी भारत-चीन सीमेवरील तणाव, वस्तू व सेवा कर, देशातील वाढती बेरोजगारी यासह इतर मुद्द्यांवर आवाज उठवणार आहे, असेही राऊत यांनी नमूद केले. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख