गांधी घराणे हे काँग्रेसचे 'आधार कार्ड' : संजय राऊत (व्हिडिओ) - Shivsena Leader Comments on Congress President ship row | Politics Marathi News - Sarkarnama

गांधी घराणे हे काँग्रेसचे 'आधार कार्ड' : संजय राऊत (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्याकडे चांगले नेतृत्व गुण आहेत. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्त्व चांगले केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांनी स्वतःला या पदावरुन दूर केले. मला व्यक्तिशः हा निर्णय पटला नव्हता. कारण शेवटी ते सेनापती आहेत, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे

मुंबई :  ''आपल्या पक्षाचे नेतृत्त्व कुणाकडे असावे, हा कॉंग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे . केंद्रात काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आहे.  मात्र त्यांची ताकद कमी झाली आहे हे सत्य आहे. काँग्रेस पक्षाने अंतर्गत मतभेद संपून मजबूत होणे अपेक्षित आहे. काँग्रेसला उभारी येणार गरजेचे आहे . गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड आहे. काँग्रेसमध्ये गांधी घराण्या पलीकडे कोणी नेतृत्व करावे हे संयुक्तिक नाही. काँग्रेसचे नेतृत्व करण्याइतकी क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये आहे," असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे केले. 

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, ''वास्तविक सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्याकडे चांगले नेतृत्व गुण आहेत. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्त्व चांगले केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांनी स्वतःला या पदावरुन दूर केले. मला व्यक्तिशः हा निर्णय पटला नव्हता. कारण शेवटी ते सेनापती आहेत. पक्षाला पूर्णपणे वेळ देणारा अध्यक्ष हवा हा त्या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे योग्य आहे. मात्र, सोनिया गांधी पूर्णवेळच काम करत आहेत. राहुल गांधीही पूर्णवेळ पक्षासाठी काम करत होते,"

काँग्रेस आमदारांना कमी निधी मिळतो याबाबत नेमके शिवसेनेला काय म्हणायचे आहे असे विचारले असता राऊत म्हणाले, "शिवसेनेला काय म्हणायचे आहे हे सरकारने सांगायल पाहिजे  कारण हा शासकीय विषय आहे.  एक विषय समोर आला आणि आम्ही त्यावर मत व्यक्त केले. आज सकाळीच मला महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा फोन आला होता. त्यांनीही 'सामना'च्या अग्रलेखात चर्चा केली. काँग्रेसचे आमदार निधी वाटपावरुन नाराज आहेत, असे ते म्हणाले. निधीवाटपात समतोल असणे गरजेचे आहे. कारण तीन पक्षांचे सरकार आहे, अशी भूमीका त्यांनी व्यक्त केली. मला वाटते त्यांची भूमीका योग्य आहे,"

राऊत पुढे म्हणाले, "आमदार ज्यावेळी मतदारसंघाचा विकास करतो, त्यावेळी कालांतराने राज्याचा विकास होत असतो. २८८ आमदार ज्यावेळी आपापला मतदारंघ सांभाळतात त्यावेळी ते आपले राज्य सांभाळत असतात. या विषयावर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी यापूर्वी चर्चा केली आहे. त्यावेळी मी सुद्धा तेथे होतो. काँग्रेस पक्षामध्ये किंवा अन्य पक्षांमध्ये आमदार नाराज असू नयेत. मला खात्री आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यातून मार्ग काढतील,"

''अर्थखाते जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे अजित पवार यांच्याकडे ते खाते आहे व नगरविकास खात्याचे काही वाटत नगरपालिकांना झाले असेल. आहे, असे बाळासाहेब थोरात यांचे म्हणणे आहे. मात्र, आघाडी सरकारमध्ये एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढणे हे राज्य चालवण्याचा दृष्टीने सोयीचे असते,'' असेही राऊत म्हणाले. 

विजय वडेट्टीवार यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, "आमचा त्यांच्याशी संवाद चांगला आहे. राज्यातील सरकारमधून बाहेर पडावे, अशी इच्छा राहुल गांधी यांची नाही. आमचा त्यांच्याशी योग्य संवाद सुरू आहे. राज्यातील सरकार कसं सुरु आहे हे दिल्लीतील नेत्यांना चांगले माहित आहे. त्यामुळे हे सरकार पडेल असं वाटत नाही,"
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख