दे धक्का! शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
दे धक्का! शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Shivsena Leader Ashok Shinde joins Congress

मुंबई : माजी राज्यमंत्री व हिंगणघाट विधानसभेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होती. अखेर मुंबई टिळक भवनमध्ये शिंदे यांचा काँग्रेस प्रवेश झाला. (Shivsena Leader Ashok Shinde joins Congress)

शिंदे हे शिवसेनेचे उपनेते होते. तसेच ते हिंगणघाट मतदारसंघात तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. शिंदेंचा काँग्रेस प्रवेश म्हणजे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. 'शिवसेनेला विदर्भाशी काही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र लबाड लोकांची फौज शिवसेनेत तयार झालेली आहे. यात आपली घुसमट होत होती. म्हणून मी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसचा मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला,' असे शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. 

शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना पक्षात स्थान राहिले नव्हते. या सर्व परिस्थितीला वैतागून अखेर त्यांनी शिवबंधन तोडले. हिंगणघाट विधानसभा तसेच जिल्ह्याच्या राजकारणात अशोक शिंदे यांचा मागील ३० वर्षांपासून दरारा आहे. ते शिवसेनेचे उपनेते होते. तसेच ते शिवसेनेकडून तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. शिवाय युती काळात त्यांनी राज्यमंत्री पदही भूषविले आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणात संपर्कप्रमुख म्हणून माजी खासदार अनंत गुढे यांचा प्रवेश झाल्यानंतर या दोघांत वर्चस्वावरून वाद वाढला होता. जिल्ह्यातील शिवसेनेच्या निर्णयात अशोक शिंदे यांना डावलण्याचा प्रकार सुरू झाला. अलीकडेच भाजपमधून ११ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. ही बाब माजी आमदार शिंदे यांच्यापासून दूर ठेवण्यात आली होती. या कारणाने नाराज असलेल्या माजी आमदार शिंदे यांनी काँग्रेसचा हात धरला. स्थानिक विधानसभा क्षेत्रात काँग्रेसही अनुभवी नेतृत्वाच्या शोधात होती. माजी आमदार अशोक शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसला बळ मिळाले आहे. 

टिळक भवनमध्ये शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसची वाट धरली. टिळक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान आदी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in