'घंटानाद' आंदोलनामुळे फिजिकल डिस्टन्सिंगची 'काशी' झाली : शिवसेनेची टीका - Shivsena Criticizes BJP's Agitation for Opening up of Temples | Politics Marathi News - Sarkarnama

'घंटानाद' आंदोलनामुळे फिजिकल डिस्टन्सिंगची 'काशी' झाली : शिवसेनेची टीका

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

'विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही. महाराष्ट्रातील प्रबळ विरोधी पक्षाने  सर्वत्र घंटानाद केला. कुठे थाळीनाद केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाचेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा या मागणीसाठीच हा घंटानाद होता. विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

मुंबई :  लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय?, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजपच्या घंटानाद आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. भाजपतर्फे जे घंटानाद आंदोलन झाले त्याची छायाचित्रे पाहिल्यावर समजले या ‘डिस्टन्सिंग’ची कशी जोरदार काशी झाली आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्याच्या प्रश्नी विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे, असे शिवसेनेने 'सामना' या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे. 
 
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची प्रथा आहे, पण सध्याच्या काळात विरोधी पक्षांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असे म्हणणे अधिक व्यावहारिक ठरेल, अशी टीकाही या अग्रलेखात करण्यात आली आहे. ''विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही. महाराष्ट्रातील प्रबळ विरोधी पक्षाने  सर्वत्र घंटानाद केला. कुठे थाळीनाद केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाचेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा या मागणीसाठीच हा घंटानाद होता. विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे,'' असे शिवसेनेने म्हटले आहे.

''भाजपाच्या पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई मंदिर उघडण्याचे आंदोलन सुरू केले आहे. तिकडे संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार जलील मियांनी दोन सप्टेंबरनंतर मशिदीची टाळी उघडण्याची घोषणा केली आहे. जलील यांनी मशिदी उघडण्याची बांग दिली म्हणून भाजप पुढाऱ्य़ांनी राज्याच्या आरोग्याचा विचार न करता 'घंटा' वाजवणे हे बरे नाही. मुळात सर्वच धर्मीयांची प्रार्थनास्थळे का बंद करावी लागली? देवांना बंदिवान का व्हावे लागले? याचा सारासार विचार करून याप्रश्नी विरोधकांनी मतप्रदर्शन करणे गरजेचे आहे,'' असाही सल्ला 'सामना'तून देण्यात आला आहे. 

''लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी. ज्या 'मनःशांती'चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मनःशांतीचा मार्ग त्यागातून जात असतो. मनःशांती ही महात्मा गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासाठी असते, गौतम बुद्धाने मनःशांतीसाठी राज्याचा त्याग तर केलाच, परंतु कठोर साधनादेखील केली. असा त्याग सध्याचे राजकारणी करणार आहेत काय? दोन वेळची चूल पेटवणे हीच लाखोंसाठी मनःशांती असते, तर अनेकांना राजकीय खुर्चीप्राप्ती हाच मनःशांतीचा मार्ग वाटतो,'' असा टोलाही 'सामना'ने लगावला आहे. 
Edited By- Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख