भूकंपापूर्वीच भाजपचा  शिवसेनेला हादरा 

भूकंपापूर्वीच भाजपचा  शिवसेनेला हादरा 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेताना शिवसेना मंत्र्यांच्या उपस्थित घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळी केली. भूकंप घडविण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला भूकंपापूर्वीच हादरा दिला. मुख्यमंत्र्यांनी एका फटक्‍यात शिवसेनेच्या आंदोलनातील हवाच काढून घेतली. शेतकरी संपाचे श्रेय सर्व शेतकरी संघटनांनी घेतल्याने शिवसेनेची गोची झाली आहे. 

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने फडणवीस सरकारला लक्ष केले होते. दोन्ही कॉंग्रेसपेक्षा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने विशेषत: उद्धव ठाकरे यांनी एकीकडे फडणवीस सरकारला फटकारत केंद्रातील मोदी सरकारलाही शिंगावर घेतले. भाजपच्या या मित्रपक्षाचा एकही दिवस असा गेला नाही की त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले नाही. सरकारविरोधात वातावरण निर्मिती करून शेतकऱ्यांमध्ये फडणवीस यांची "इमेज डॅमेज' करण्याचा प्रयत्नही सातत्याने करून पाहिला. पण, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट मुख्यमंत्री हे चतूर निघाले. त्यांनी शिवसेनेला एकीकडे खेळवत ठेवले आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंना गोंजरले. त्यामुळे शिवसेनेने भाजपविरोधात जी ठोस भूमिका घ्यायला हवी होती. ती घेतली गेली नाही. या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकऱ्यांनीही त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. नाशिक येथील शेतकरी मेळाव्यात त्याचा अनुभव शिवसेनेने घेतला होता. नेमके या उलट शेतकरी संघटनांचे झाले. शिवसेनेच्या आंदोलनातील हवाच मुख्यमंत्र्यांनी काढून घेतली. 

राजू शेट्टींसह शेतकरी संघटना आपल्या एकाच मुद्यावर ठाम होत्या. सरसकट कर्जमाफी मिळायलाच हवी त्यांचा हा ठेका कायम होता. राज्यात शेतकऱ्यांनी जो अभूतपूर्व शेतकरी संप केला त्याचे सर्वश्रेय शेतकरी संघटनांच्या पदरात पडले. महाराष्ट्र बंदमध्येही शिवसेनेने तोंडदेखलेपणा केला. या आक्रमक आणि लढवय्या संघटनेची जी साथ मिळायला हवी होती ती शेतकऱ्याला मिळाली नाही. कॅबिनेटवर शिवसेनेने बहिष्कार टाकण्यावरून पक्षाच्या नेत्यांमध्येच एकवाक्‍यता नव्हती. एकजण मुख्यमंत्र्यांची बाजू घेत होता तर दुसरे सर्वजण बहिष्कार टाकल्याचे सांगत होते. त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्‍नावर पक्ष गोंधळलेला दिसतो. 

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले असताना उद्धव ठाकरे नेमके परदेशात होते. वास्तविक भडकेलेल्या आंदोलनाचा फायदा उठविण्याची एक नामी संधी शिवसेनेला होती. पक्षाचे प्रमुखच राज्यात नाहीत म्हटल्यावर रणांगणात लढणाऱ्यांना सैनिकांना बळ येणार कसे. प्रमुखांच्या खालोखाल असलेले नेते फडणवीस सरकारला दररोज इशारे देत आहेत. राज्यात भूकंप होणार असल्याचे खासदार संजय राऊत कितीही सांगत असले तरी तसा भूपंक होण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. जर भूकंप घडवायचाच असेल तर इतके जाहीरपणे सरकारला सांगण्याची गरज आहे आणि मुहुर्त शोधायचे कारण तरी काय ? राजकारणातील डावपेच असे जाहीरपणे टाकले जातात का ? शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. त्याचे स्वागत विरोधकांसह शेतकरी संघटनांनी केले आहे. केवळ शिवसेनाच त्याविषयी काही भाष्य करीत नाही. सरकारने अजून शेतकऱ्यांना काय द्यायचे हा मुद्दा उरतोच. 

मुख्यमंत्र्यांची खेळी 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना मंत्रिगटाचे सदस्य करून एका दगडात दोन पक्षी मारले. थोडी मखलाशी केली. कर्जमाफीचा निर्णय घेताना रावते यांना उपस्थित राहावे लागले. जर ते उपस्थित राहिले नसते तर शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेशही गेला असता. सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी कर्जमाफीचे स्वागतच केले आहे. त्यामुळे पुन्हा सरकारविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेला उरतो का ? याचा विचार राऊत यांनी करायला हवा. एकीकडे सरकारची आरती ओवाळायची आणि दुसरीकडे शिव्या द्यायच्या हा दुटप्पीपणा राज्यातील जनतेच्या पचनी कसा काय पडू शकतो. जर कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सरकारने केली. शेतकरी वर्गाने स्वागत केले तर भाजपच मध्यावधी निवडणुकीला स्वत:हून सामोरे जाईल. ते मित्राच्या निर्णयाची प्रतिक्षाही करणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. 

आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते ना तर एका फटक्‍यात सरकारला वटणीवर आणले असते. बाळासाहेबांची हीच शिवसेना गेल्या काही महिन्यापासून सरकारला पोकळ इशारे देत आहेत. त्याचा कणभरही परिणाम सरकारवर झाला नाही. एकेकाळी मुठी आवळत हातात दगड घेणारा शिवसैनिकही पक्षात उरला नाही. राजकारणही बदलले. युवा पिढीला राडा नको तर करिअर महत्त्वाचे वाटते. त्यामुळे दगडसंस्कृती राज्यात हळूहळू मागे पडत चालली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

शेतकऱ्यांचा प्रश्‍न हा काही एकट्या शिवसेनेने हाती घेतला नव्हता. त्यामध्ये भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्वच पक्ष होते. यामुळे शेतकरी प्रश्‍नाचे राजकारण करून सत्ता मिळेल. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल हे स्वप्न पाहण्यात काहीच हरकत नाही. पण स्वप्न वास्तवात येणार कसे याचे राजकीय गणित पक्के हवे. शिवसेनेचे ते सध्या तरी कच्चे दिसते. याविषयी जो काही बोध घ्यायचा आहे तो संबधितांनी घ्यावा.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com