पंतप्रधान मोदींच्या कोरोना लशीच्या वादावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले...

देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे.
https://www.sarkarnama.in/desh/senior-congress-leader-mallikarjun-kharge-denies-covid-vaccine-71433
https://www.sarkarnama.in/desh/senior-congress-leader-mallikarjun-kharge-denies-covid-vaccine-71433

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सोमवारपासून (ता.1) 60 वर्षांवरील नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लस घेतल्यानंतर याबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. या शंका उपस्थित करणारांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उत्तर दिले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. या लसीकरणाबाबत स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करुन माहिती दिली होती. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये आपल्या डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे सांगत पंतप्रधानांनी या सर्वांचे कौतुक केले होते. लस घेण्यास पात्र आहेत, त्या सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

मोदींनी लस घेतल्यानंतर त्यांनी नेमकी लस घेतली की नाही, असा वाद सुरू झाला आहे. यावर शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मोदींवर शंका घेणारे लोक कोत्या मनोवृत्तीचे आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीतही ते राजकारण करीत आहेत. ते केवळ पंतप्रधानांना बदनाम करीत नाहीत तर देशाचेही नुकसान करीत आहेत. त्यांच्या अशा प्रकारच्या आरोपांमुळे कोरोना संसर्ग रोखण्यात अडथळे निर्माण होत आहेत, याची माहिती त्यांनी नाही.  

पंतप्रधान मोदी हे स्वत:साठी जगत नाहीत. त्यांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित आहेत. मोदी हे त्यांची लसीकरणासाठी वेळ येईपर्यंत थांबले होते. उद्या मीसुद्धा कोरोना लस घेणार आहे, असे चौहान यांनी सांगितले. मोदींनी काल भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या स्वदेशी लशीचा पहिला डोस घेतला होता. दुसरा डोस ते 28 दिवसांनंतर घेतील. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

आता दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com