शिवराजसिंह म्हणतात, वादे है वादोंका क्या..?

मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनीही याला प्रत्युत्तर दिले आहे.
shivraj singh chouhan criticizes congress manifesto for mp assembly byelection
shivraj singh chouhan criticizes congress manifesto for mp assembly byelection

भोपाळ : मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेशात सत्तांतर करण्याचा चंग बांधला असून, जोरदार प्रचार सुरू केला आहे. काँग्रेसने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यावरुन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

काँग्रेसने आज पोटनिवडणुकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या वेळी बोलताना कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, आमदार जितू पटवारी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.  कमलनाथ यांनी मुख्यमंत्री चौहान यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, शिवराजसिंह चौहानांनी नारळ फोडणे, बनावट घोषणा आणि पायाभरणी करणे याशिवाय सात महिन्यांत दुसरे काहीही केलेले नाही. निवडणूक आली की पाकिस्तान आणि चीनचा मुद्दा उपस्थित करुन जनतेचे लक्ष विचलित केले जाते. ते आताही जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहेत. शिवराज हे दिशाभूल करणाऱ्या राजकारणात माहीर आहेत.  

काँग्रेसने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, असे शिवराज म्हणतात. परंतु, त्यांचाच मंत्री सभागृहात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्याची कबुली देतो, असे कमलनाथ यांनी स्पष्ट केले. 

याला मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मागील निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. असे असताना काँग्रेसकडून नवीन आश्वासन दिली जात आहेत. काँग्रेसची मानसिकता म्हणजे, 'वादे है वादोंका क्या.'  मागील निवडणुकीवेळी त्यांनी 10 दिवसांत अनेक गोष्टी करण्याचे वचन दिले होते. मात्र, ते विसरुन गेले. त्यांच्या आश्वासनांची सत्यता जनतेला आता पुरेपूर माहिती आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com