शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर घणाघात; फक्त लुटण्याचे काम केल्याचा आरोप

पालिकेतील 'कचरा' हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोलाही शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.
शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर घणाघात; फक्त लुटण्याचे काम केल्याचा आरोप
ShivendraRaje Bhosle slams UdayanRaje Bhosle over corruption

सातारा : सातारा शहराचा विकास होईल या अपॆक्षेने सातारकरांनी एकहाती सत्ता खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीकडे दिली. पण, सातारकारांचा मोठा अपेक्षाभंग झाला. सातारा पालिकेत कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांचे गळे धरण्याच्या ऐतिहासिक घटना सातारकरांना पाहाव्या लागल्या. गेल्या साडेचार, पावणेपाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केल्याची घणाघाती टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. (ShivendraRaje Bhosle slams UdayanRaje Bhosle over corruption)

आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असून सत्ताधाऱ्यांनी अख्य्या टर्ममध्ये भ्रष्टाचाराचा सुकाळ केला. सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी, हा तर केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे, हे सातारकर ओळखून आहेत. त्यामुळे पालिकेतील 'कचरा' हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोलाही शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला. 

गेल्या साडेचार- पावणेपाच वर्षात सातारा पालिकेत सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांमध्ये  टेंडर, टक्केवारीसाठी लागणारी कळवंड सातारकर उघड्या डोळ्याने पाहत आले आहेत. सातारा विकास आघाडीत भ्रष्टाचारावरून सुरु असलेल्या कळवंडीवर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न नेत्यांना अनेकदा करावा लागला हि वस्तुस्थिती आहे, असे स्पष्ट करून शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले की,  नेते भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत असा नुसता ढोल बडवून अन डांगोरा पिटून पालिकेतील भ्रष्ट कारभाराचे सत्य लपवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला किंबहुना तसा प्रयत्न करण्याची दुर्दैवी वेळ अनेकदा आली. 

वास्तविक सातारा पालिकेला सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनवले असून सत्ताधाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही, हे सातारकरांना चांगलेच कळून चुकले आहे. आता परवाच निवडणूक आयोगाने प्रभाग रचने संदर्भात  सूचना काढल्याने सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा पाऊस दाखवून नागरिकांना भुलवण्याचा उद्योग सुरु केला आहे. निवडणूक आयोगाने सूचना थोडी उशिरा काढली असती तर सातारकरांना हा थापेबाजी पाऊस आज दिसला नसता, हा कथित विकासकांचा पाऊसही लांबला असता, असंही शिवेंद्रराजे यांनी नमूद केलं.

सत्ताधारी नेत्यांनी पत्रकबाजी करून पाडलेला पाऊस हा निवडणुकीचा मोसम आल्यानेच पडला आहे, हे सातारकर जनता चांगलीच ओळखून आहे. अख्या टर्ममध्ये सत्ताधाऱ्यांनी कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांची गचुंडी धरली, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प, घंटागाडी अशा सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार झाला. कमिशन तुला  मिळतंय का मला अशी अजब स्पर्धाच सत्ताधाऱ्यांनी पालिकेत सुरु केली. हद्दवाढ होऊन आता वर्षभराचा कालावधी लोटला पण, हद्दवाढीतील नवीन भागासाठी एकही काम सत्ताधाऱ्यांनी केलं नाही. कोरोना महामारीचा विळखा बसला असताना साधं एक आयसोलेशन सेंटर सुरु केलं नाही आणि आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निघाले विकासकामांचा पाऊस पाडायला. हे न समजण्याएवढी जनता काही दूधखुळी नाही, हे सत्ताधाऱ्यांनी ध्यानी ठेवले पाहिजे, अशी टीका शिवेंद्रराजे यांनी केली आहे.

सातारा पालिका भ्रष्टाचाराने अक्षरशः बरबटली आहे. वर्तमान पत्रातून विकासकामांची जंत्री प्रसिद्ध करून निवडणूक मोसमाचा पाऊस पडला. त्यामुळे निवडणुकीचे वारे आता वाहू लागले, याची जाणीव सातारकरांना झाली आहे. आतातरी विकासकामे करून नागरिकांचा फायदा करा. नेहमीसारखं सत्ताधारी नगरसेवक आणि मर्जीतल्या ठेकेदारांचे खिसे भरून स्वतःची तुंबडी भरण्याचा उद्योग होणार नाही, याची दक्षता नेत्यांनी घ्यावी एवढीच माफक अपेक्षा, असे शिवेंद्रराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in