सुवर्ण होनच्या साक्षीने होणार शिवराज्याभिषेक दिन पण मोजक्याच उपस्थितीत - shivaji maharaj coronation day will be celebrated on raigad fort | Politics Marathi News - Sarkarnama

सुवर्ण होनच्या साक्षीने होणार शिवराज्याभिषेक दिन पण मोजक्याच उपस्थितीत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 जून 2021

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा ऐतिहासिक सुवर्ण होनच्या साक्षीने साजरा होईल. 

महाड : रायगड किल्ल्यावर (Raigad Fort) उद्या (ता.6) शिवराज्याभिषेक दिन (Coronation day) सोहळा होणार आहे. हा सोहळा रायगडाच्या पवित्र भूमीत मिळालेल्या ऐतिहासिक सुवर्ण होनच्या साक्षीने साजरा होईल. कोरोनामुळे (Covid019) गडावर मात्र, केवळ 20 जणांना जाण्यासच परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर कडक पोलीस (Police) बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला आहे. 

रायगड किल्ल्यावर दरवर्षी ६ जूनला मोठ्या उत्साहाने व हजारो शिवप्रेमींच्या गर्दीत हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या कार्यक्रमाला खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असते. कोरोना महामारीमुळे मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा होईल. गडावर केवळ वीस जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यंदाचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा ऐतिहासिक शिवकालीन सुवर्ण होनच्या साक्षीने साजरा केला जाईल. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी होन चलनात आणले होते. 

हेही वाचा : ममतांचा वारसदार ठरला...

शिवप्रेमींना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रायगडावर ६ जूनला येण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते. कोरोनाचे संकट पाहता शिवप्रेमींनी गडावर न येता घरीच शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. असे असले तरी रायगडावर गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गाजवळ रायगडकडे जाणारी नाते खिंड या ठिकाणी नाकेबंदी केली आहे. पाचाड येथेही कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाचाड ग्रामपंचायतीने यापूर्वीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ६ जूनपर्यंत गावामध्ये जनता कर्फ्यू लागू केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख