शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसला 'मिनी विधानसभे'तच कळेल आपली ताकद - Shiv Sena, NCP and Congress will know their strength in Local Body elections-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसला 'मिनी विधानसभे'तच कळेल आपली ताकद

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जुलै 2021

राज्यात पुढील वर्षी जवळपास 70 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्बबळावर उतरण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. त्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली. एकमेकांवर टिप्पणी करताना वादही झाले. पण या निवडणुकांतच काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील ताकद दिसणार आहे. महाविकास आघाडी सरकारचे भवितव्यही या निवडणुकांमध्ये ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Shiv Sena, NCP and Congress will know their strength in Local Body elections)

राज्यात पुढील वर्षी जवळपास 70 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारांनी दिलेला कौल पुढे विधानसभेच्या निवडणुकीतही दिसतो, असे मानले जाते. त्यामुळे सर्वच पक्षांकडून या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी उमेदवार उतरवले जातात. राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेने दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली.

हेही वाचा : त्या बारा आमदारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या हाती

आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभेच्या निवडणुकांमध्येही हा आघाडी कायम राहणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. तर राष्ट्रवादी कडून अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. पण जाणकारांच्या मते हे तिन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्बळावरच उतरतील, अशी शक्यता आहे. 

राज्यातील आपली ताकद आजमावण्यासाठी तिन्ही पक्षांना ही चांगली संधी असल्याचे बोलले जात आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी तिन्ही पक्ष आता कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाला विस्तारासाठी या निवडणुका स्वबळावर फायदेशीर ठरणार आहे. पण स्थानिक परिस्थती पाहून आघाड्या केल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

विस्तारासाठी प्रत्येक पक्ष आपल्यापरीने प्रयत्न करणार असल्याचे तिन्ही पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. पक्षवाढीसाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे, तरूण नेतृत्वाला संधी देण्यासाठी या निवडणुका महत्वाच्या आहेत. राज्यात विदर्भात काँग्रेसची ताकद असून मुंबईसह ठाणे, कोकणात शिवसेनेचा वरचष्मा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा दबदबा आहे. त्यामुळं तिन्ही पक्षांना आपली वोटबँक टिकवण्यासाठी स्वबळाचाच नारा देणं फायदेशीर ठरेल, असं या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख