मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयांवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला आहे. सरनाईक यांना चौकशीसाठी आज हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले होते. मात्र, सरनाईक हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आमदार सरनाईक यांचे मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालये आणि घरावर ईडीने काल छापा टाकत कारवाई केली होती. दहा ठिकाणी छापा टाकून कारवाई केल्यानंतर सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोचले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांची चौकशी सुरू केली होती.
ईडीने सरनाईक यांचे पुत्र विहंग यांची काल पाच तास कसून चौकशी केली आहे. चौकशी झाल्यानंतर ते ठाण्याला रवाना झाले होते. विहंग यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने विहंग सरनाईक यांची आज ५ तास चौकशी केली. त्यांच्याकडून १० कंपन्यांसंदर्भातील प्राथमिक माहिती घेण्यात आली आहे. त्यांच्याशी संबंधित कंपन्यांचे सगळे व्यवहार तपासले जाणार आहेत. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा त्यांनी चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. आज छाप्यात जप्त केलेल्या कागदपत्रांच्या अभ्यास करून पुन्हा एकदा यासंदर्भात प्रश्नावली तयार करून चौकशी होणार आहे.
ईडीने सकाळी घरावर छापे टाकल्यानंतर आमदार सरनाईक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ईडीने आमच्यावर छापे का टाकले हे मलाच माहीत नाही. मी या कारवाईबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या छाप्यांप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले होते.
ईडीने आमदार सरनाईक यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, सरनाईक हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ईडीने एकूण 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात प्रताप सरनाईक यांचे घर, मुलांचे घर, कार्यालये ही ठिकाणे असल्याचे समजते. परदेशात पैसे पाठवल्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
या कारवाईमुळे शिवसेनेचे नेते प्रचंड संतापले असून त्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. सरनाईक हे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आक्रमक होते. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची नोटीसही सरनाईक यांनीच दिली होती.
Edited by Sanjay Jadhav

